आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पारनेर - तालुक्यातील घाणेगाव पाणीपुरवठा योजनेच्या 25 लाख 85 हजार 828 रुपये खर्चास राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेचा दरडोई खर्च विहित निकषांपेक्षा जास्त असल्याने या योजनेची मंजुरी रखडली होती. आमदार विजय औटी यांनी मंजुरीसाठी पाठपुरावा केल्यानंतर अखेर या योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली.
घाणेगावकरिता पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाल्यानंतर 4250 रुपये दरडोई दराने या योजनेसाठी खर्च येत होता. मात्र, शासनाच्या निकषांप्रमाणे या योजनेस केवळ 1789 रुपये दरडोई दराने निधी उपलब्ध होत होता. यामुळे ही योजना शासनाच्या लाल फितीत अडकली होती.
परिणामी, योजना मंजूर असूनही घाणेगावच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ही योजना मार्गी लागावी, यासाठी ग्रामस्थांनी आमदार ओैटी यांना साकडे घातले होते. ऐन दुष्काळात या योजनेस मंजुरी मिळाल्याने घाणेगावकरांना दिलासा मिळाला आहे.
पाच योजनांना विशेष मंजुरी - कामठवाडी, देववाडी, चिकणे झाप, डोंगरवाडी व काताळवेढा येथील पाणी योजनाही विविध कारणांमुळे बंद पडल्या होत्या. घाणेगाव पाणी योजनेबरोबरच या योजनांनाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
लवकरच निविदा प्रक्रिया - या योजनेंतर्गत पाण्याचा स्त्रोत असलेल्या शिवकालिन विहिरीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. विहिर ते टाकीदरम्यान 210 मीटर लांबीची पाइपलाइन, गावठाणांतर्गत 3200 मीटरची वितरण व्यवस्था, 15 हजार लिटर पाणी साठवण क्षमतेची टाकी आदी कामे करण्यात येतील. या योजनेच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल.’’ अजय मुळे, उपअभियंता, पाणीपुरवठा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.