आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोड धरणामधील पाणीसाठय़ात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - कुकडी प्रकल्पातील सर्वांत मोठे धरण असलेले डिंभे धरण बुधवारी रात्री, तर श्रीगोंदे तालुक्याची जीवनदायिनी असलेले घोड धरण गुरुवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले. डिंभे व घोड धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे आर्वी बेटाला पाण्याने वेढले असून संपर्क तुटला आहे.

कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसाने कुकडी धरण समूहातील पाणीसाठा सुमारे 80 टक्के झाला आहे. सहापैकी चार धरणे ओसंडून वाहू लागल्याने पुणे जिल्ह्यासह श्रीगोंदे, कर्जत, करमाळा व पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साडेअकरा टीएमसी क्षमतेच्या डिंभे धरणात गुरुवारी 85 टक्के पाणीसाठा झाला. या धरणातून सात हजार क्युसेक्सने घोड नदीत पाणी सोडण्यात आले. वडज व येडगाव ही कुकडीतील धरणे आधीच तुडूंब भरली आहेत. वडजमधून 800 तर येडगावमधून 7500 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. या तिन्ही धरणांतून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग सुमारे 15 हजार क्युसेक्सपेक्षा अधिक असून ते पाणी घोडच्या पात्रात गुरुवारी पोहोचले. सुमारे सहा टीएमसी क्षमतेचे घोड धरण गुरुवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले. घोड कालव्यातून श्रीगोंदे तालुक्याला आवर्तन सोडण्यात आले. धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने त्यातून 16 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे घोडच्या काठावर राहणार्‍या नागरिकांना प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी दिवसभर नदीकाठच्या गावात धोक्याचे सायरन वाजवले जात होते.

घोड धरणातील सोडलेले पाणी घोड नदीवाटे सांगवी येथे भीमा नदीत विलीन झाले. घोड-भीमेच्या संगमामुळे सांगवीपासून जवळ असलेल्या गावांत महापुराने थैमान घातले आहे. निमगाव खलूजवळ भीमेचा एकूण विसर्ग 50 हजार क्युसेक्स इतका होता. श्रीगोंदे-दौंडला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला, तर काही फुटांपर्यंत पुराचे पाणी वाढले. पाण्याचा प्रवाह पाहता नवीन पूलही जलमय होण्याची चिन्हे आहेत. गार, कौठा, अजनूज, जलालपूर आदी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावध केले आहे. भीमेचे पाणी शेतात शिरल्याने पेडगावच्या अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने आर्वी बेटासाठी दिलेली यांत्रिक बोट इंजिन नादुरुस्त असल्याने बंद आहे. तहसीलदार अनिल दौंडे यांनी आर्वी बेटासाठी आरोग्य पथकास सज्ज ठेवले आहे.

आर्वी बेटावरील नागरिकांचा जीव मुठीत
भीमेच्या पात्रात असलेल्या आर्वी बेटाला महापुराने गुरुवारी वेढले. बेटावरील सुमारे 500 नागरिकांचा जीव मुठीत सापडला आहे. महापूर आला की आर्वी बेटाचा संपर्क तुटतो. आताही तसेच घडले. पुराची पूर्वकल्पना असल्याने नागरिकांनी आधीच जीवनावश्यक वस्तुंचा साठा बेटावर करून ठेवल्याची माहिती माजी सरपंच सुनील गिरमकर यांनी ‘दिव्य मराठी’ ला दिली.