आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोसपुरी पाणी योजनेसाठी अर्धा किलोमीटरचा चर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर तालुक्याला वरदान ठरलेली १८ गावांसाठीची घोसपुरी पाणी योजना विसापूर तलावातील पाणीपातळी खालावल्यामुळे बंद पडण्याची शक्यता आहे. ही योजना चालवण्यासाठी धरणात अर्धा किलोमीटरचा चर खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण गाळ जास्त असल्याने या कामात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

घोसपुरी पाणी योजना विसापूर तलावावर अवलंबून आहे. या योजनेसाठी सुमारे साडेअठरा कोटी खर्च आला होता. १७५ अश्वशक्तीच्या विद्युत पंपांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाते. सध्या तलावातील साठा १० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. पाणी पातळी घसरल्याने फुटव्हॉल्व्हपासून पाणी अर्धा किलोमीटर दूर गेले आहे. या योजनेवर घोसपुरी, सारोळा कासार, अकोळनेर, जाधववाडी, सोनेवाडी, चास, अरणगाव, खंडाळा, बाबुर्डी घुमट, खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे-झरे, वाळकी, तांदळी वडगाव, वडगाव तांदळी, देऊळगाव सिद्धी, राळेगण गुंडेगावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. ही योजना बंद पडल्यास तालुक्यात टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.

पावसाने दडी मारल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या योजनेवर दररोज ३० ते ३५ टँकर भरण्यासाठी उद्भव उपलब्ध होतो. पण पाणीपातळी खालावल्याने सद्य:स्थितीत योजना बंद आहे. ही योजना चालवण्यासाठी सभापती संदेश कार्ले यांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या माध्यमातून योजनेच्या फुटव्हॉल्व्हपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दहा ते बारा कर्मचारी यंत्रसामग्रीकडून काम केले जात आहे. पण गाळ जास्त असल्याने चर खोदण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. संपूर्ण चर खोदता आला नाही, तर तलावातच लहान पाझर तलाव करून पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेही विचारविनिमय सुरू आहे. चर खोदण्याच्या कामासाठी आठवडा लागण्याची शक्यता आहे. या योजनेवर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. योजना चालवताना समिती मेटाकुटीला आली आहे.

जिल्हा परिषद सध्या मिरी-तिसगाव, बुऱ्हाणनगर, शेवगाव-पाथर्डी यासह पाच योजना चालवत आहे. जिल्हा परिषदेने इतर पाच योजनांबरोबरच घोसपुरी पाणीपुरवठा योजना चालवून तालुक्यातील जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लाभधारक क्षेत्रातील नागरिकांमधून केली जात आहे.

पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
तलावातीलपाणीपातळी वेगाने खालावत असल्याने चर खोदण्याचा पर्याय निवडण्यात आला. पण पावसाने दमदार हजेरी लावली नाही, तर चरातूनही पाणी येणार नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी उद्भव शोधण्यासाठी धडपड
विसापूरतलावातील पातळी खालावल्याने चर खोदण्यात येत आहे. पण पाणी गढूळ झाल्याने दूषित बनले आहे. ढवळपुरीजवळ असलेल्या काळू धरणातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करता येईल. त्यासाठी तात्पुरती पाणी योजना करून हे पाणी जवळ आणता येईल. यासंदर्भात आम्ही नुकतीच तहसीलदारांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे.'' संदेशकार्ले, सभापती, नगर पंचायत समिती.