आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात मनपाची शास्तीमाफीची भेट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हो, नाही म्हणत अखेर महापालिकेने गुरुवारी शास्तीमाफीचा निर्णय घेतला. ३१ मार्च १०१४ पूर्वीच्या थकबाकीदारांची ७५ टक्के, तर चालू आर्थिक वर्षातील थकबाकीदारांची शंभर टक्के शास्ती माफ करण्यात आली आहे. ही सवलत केवळ एका महिन्यासाठी (३१ जानेवारीपर्यंत) आहे. त्यामुळे शहरातील हजारो थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिका प्रशासनाने नवीन वर्षाची ही भेट दिली असली, तरी त्यामागे जास्तीत जास्त करवसुली व्हावी, हाच उद्देश आहे. त्यामुळे सवलत देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरातील मिळकतधारकांकडे तब्बल १३५ कोटींची थकबाकी आहे. त्यात ४२ कोटी ७९ लाखांची शास्तीची रक्कम आहे. शास्तीची ही रक्कम आज ना उद्या माफ होईल, त्यानंतरच थकबाकी भरू, असा पवित्रा थकबाकीदारांनी घेतला होता. आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनीही शंभर टक्के शास्ती माफ करावी, अशी मागणी लावून धरली होती.
त्यामुळे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गुरुवारी सायंकाळी शास्तीमाफीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार अाहे. शास्तीमाफीमुळे थकबाकीदार पैसे भरतील, हा एकमेव उद्देश समोर ठेवून ही सवलत देण्यात आली आहे.
जे मिळकतधारक ३१ मार्च २०१४ पर्यंतची संपूर्ण थकबाकी, तसेच त्यावरील २५ टक्के शास्तीची रक्कम भरतील, अशा थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षातील थकबाकीदारांना संपूर्ण रक्कम भरल्यास शंभर टक्के शास्तीमाफी मिळेल.
मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे जुन्या व चालू आर्थिक वर्षातील थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही भेट दिली. मात्र, शास्तीमाफीची ही सवलत केवळ एका महिन्यासाठी आहे. या कालावधीत थकबाकी न भरणाऱ्यांवर फेब्रुवारी व मार्च महिन्यात कठोर कारवाई होणार आहे. दहा लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्यांवर सर्वात आधी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

प्रशासनाने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पन्नास टक्के शास्तीमाफी दिली होती. परंतु थकबाकीदारांनी या सवलतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुन्हा शास्तीमाफीचा निर्णय घेण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. या निर्णयामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१४ या आर्थिक वर्षात केवळ २३ कोटींची थकबाकी वसूल झाली. उर्वरित ११३ कोटी रुपयांच्या थकबाकीतून शास्तीची कोट्यवधी रुपयांची रक्कम माफ होणार आहे. त्यानंतर उर्वरित थकबाकी वसुलीसाठी मनपाकडे फेब्रुवारी व मार्च असा दोन महिन्यांचा कालावधी उरेल. त्यामुळे शास्तीमाफीच्या सवलतीचा फायदा न घेणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा होईल.

बड्या थकबाकीदारांना पर्वणी
दहा लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले पन्नासपेक्षा अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यात शासकीय कार्यालये, शैक्षणिक व धार्मिक संस्था, उद्योजक, व्यावसायिक आहेत. या सर्वांकडे १५ कोटी थकले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह बड्या थकबाकीदारांनी सवलतीचा फायदा घेत थकबाकी भरली, तर मनपाची तिजोरी भरण्यास मोठी मदत होईल. मात्र, सवलत देऊनही थकबाकीदारांनी पैसे न भरल्यास मनपासमोर मोठे अार्थिक संकट उभे राहणार आहे.

थकबाकीदारांना मोठा दिलासा
^शास्तीची रक्कम माफ करावी, अशी थकबाकीदारांची मागणी होती. यासंदर्भात आयुक्तांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही याबाबत आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी जुन्यांना ७५ टक्के, तर चालू आर्थिक वर्षातील थकबाकीदारांना शंभर टक्के शास्तीमाफी दिली. आता थकबाकीदारांनी या सवलतीचा फायदा घेत थकबाकी भरणे आवश्यक आहे. मालमत्ता कर हा मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे, त्यामुळे थकबाकीदारांनी मनपाला सहकार्य करणे आवश्यक आहे.'' संग्राम जगताप, आमदार तथा महापौर.
महापालिकेचे नुकसान होणार नाही
^मनपाने सर्व विचार करूनच शास्तीमाफीचा निर्णय घेतला. त्यात मनपाचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट सवलत दिल्याने थकबाकीदार पैसे भरतील. एका महिन्यापुरतीच सवलत देण्यात आली आहे. सवलत देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर फेब्रुवारी व मार्च महिन्यात कारवाई करण्यात येईल. बड्या थकबाकीदारांनी सवलतीचा लाभ घेत मनपाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. '' भालचंद्र बेहेरे, उपायुक्त (कर), मनपा.