आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात ‘आज’ आहे, ‘उद्या’ कधीच येत नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काहीजण आजचे काम उद्या, उद्याचे काम परवावर ढकलून वेळेत काम करत नाहीत. जीवनात केवळ ‘आज’ आहे, ‘उद्या’ कधीच येत नाही. चालढकल करणार्‍यांकडे निर्णयक्षमतेचा अभाव असतो, असे प्रतिपादन प्रशिक्षक व समुपदेशक गिरीश कुळकर्णी यांनी रविवारी केले.

आशा फाउंडेशनतर्फे रावसाहेब पटवर्धन स्मारकात कुळकर्णी यांच्या 12 तास चालणार्‍या महाव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्याख्यानाचे उद्घाटन महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेविका संगीता खरमाळे, मिलिंद कुलकर्णी, सुरेश खामकर, नीलेश बागडे, प्रवीण कुलकर्णी, प्रदीप पवार, संगीता फापाळे, वनिता बागडे आदी उपस्थित होते.

कुळकर्णी म्हणाले, प्रत्येक गोष्टीत आपण स्वत: पुढाकार घेणे आवश्यक असते. आपण पुढाकार घेतल्यानंतर सर्वजण हाताला हात देऊन येतील. ‘मुले ऐकत नाहीत, ते पाहतात’ हे वाक्य प्रत्येकाने घरात लिहायला हवे. कारण मुले ऐकण्यापेक्षाही जे दिसते त्याचे अनुकरण लवकर करतात. बर्‍याचदा मुलाने प्रश्न विचारल्यानंतर पालक रागवतात. त्यामुळे मुलेदेखील त्यांना शंका विचारण्याचे टाळतात. हे केवळ वडिलांकडे सॉफ्ट स्कील नसल्यामुळेच घडते, असे ते म्हणाले.

कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. तुम्ही ते कसे करता यावर त्याचे महत्त्व ठरते. योग्य नियोजन करून कामासाठी वेळ काढायला हवा. मुलांच्या यशाचे पालकांनी कौतुक करावे, तसेच मुलांनीही पालकांनी केलेल्या कामाचे कौतुक करणे हे सॉफ्ट स्कील आहे, असे कुळकर्णी यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या युगात कर्मचार्‍याला दुसर्‍या कंपनीने पगारवाढ देऊ केली, तर तो नवी नोकरी धरतो. त्यामुळे विश्वासार्हता कमी होत चालली आहे. याला कंपनी व्यवस्थापनही जबाबदार आहे. एखाद्या कामासाठी सर्वांनी एकत्र येणे ही सुरुवात, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे ही प्रगती व कायम एकसंघ राहणे हे यश आहे. सॉफ्ट स्कीलच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी साध्य करता येतील. प्रत्येकाला यश आवडते, पण दुसर्‍याच्या यशाचा तिटकारा करणारा माणूसच आहे. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक वृत्ती बाळगल्यास यश निश्चित मिळते, असे कुळकर्णी यांनी या वेळी सांगितले.

करिअरचे कोडे उलगडले
करिअर म्हणजे काय हे एक कोडे असल्यासारखे वाटायचे. करिअर म्हणजे नेमके काय हे या व्याख्यानातून उलगडले. सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत असे उपक्रम राबवायला हवेत.’’ श्रद्धा भोसले

सकारात्मक विचारांना चालना
विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करण्यासाठी अशा व्याख्यानांची गरज आहे. करिअरबाबत जो गोंधळ मनात सुरू होता, तो संपला. सॉफ्ट स्कीलचे महत्त्व पटले. सकारात्मकतेस चालना मिळाली.’’ गौरी कुलकर्णी, विद्यार्थिनी

विविध सहा विषयांवर 12 तास व्याख्यान
करिअर म्हणजे काय, सॉफ्ट स्कीलचे महत्त्व, मानव संसाधन विकास, मी पाल्याचा .अन पाल्य माझा, आय लव्ह यू, चला यशाचे नियोजन करूया या विविध विषयांवर सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत गिरीश कुळकर्णी यांनी बारा तास मार्गदर्शन केले.