आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे पोलिसांकडूनही मारहाण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या मुलीला ताब्यात घेणार्‍या पुण्यातील दत्तनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी तिला मारहाण केल्याची व एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार संबंधित मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे गुरुवारी केली.

अभिजित किशोर भालेराव (19, घोसपुरी) याने मुलीला फूस लावून 22 जानेवारीला पळवून नेले. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शोध घेऊनही सापडत नसल्याने पोलिसांनी युवकाच्या वडिलांना ताब्यात घेतले. हे समजताच अभिजितने मुलीला 6 फेब्रुवारीला रात्री पुण्यात सोडून पलायन केले. एकाकी पडलेल्या मुलीने एसटीडी सेंटरवरून वडिलांना फोन करून पुण्यात असल्याची माहिती दिली. वडिलांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. एमआयडीसी पोलिसांनी दत्तनगर पोलिसांशी संपर्क साधला. दत्तनगर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन गुरूवारी पहाटे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. एमआयडीसी पोलिसांनी मुलीला तिच्या पालकांकडे दिले. सायंकाळी पाचच्या सुमारास पीडित मुलगी व तिच्या पालकांनी नगर येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन दत्तनगर पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली. आरोपीने मुलीला गोव्याला नेऊन पंधरा दिवस तिच्यावर अत्याचार केले. एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने मुलीचा जबाब व वैद्यकीय तपासणी केली नाही, असे गार्‍हाणे त्यांनी मांडले. अधीक्षकांनी सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना बोलावून घेतले. पीडित मुलीचा जबाब घेण्याचा व वैद्यकीय तपासणी तातडीने करण्याचा आदेश त्यांनी सावंत यांना दिले.

महिला पोलिसांनी मला मारले..
दत्तनगर पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांनी मला मारहाण केली. मारू नका अशा विनवणी करूनही ते दोन्ही खांद्यांवर काठीने मारत होते.’’ पीडित मुलगी