आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Not Ready To Go Sixty Years Old Husband, Caste Panchayat Ordered Her To Stay On Night

साठीतील नवरोबाकडे जाण्‍यास मुलीचा नकार, एका रात्रीपुरते जाण्‍याचे जातपंचायतीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - वैदू समाजातील जातपंचायतीने 15 वर्षांपूर्वी 4 वर्षांच्या चिमुकलीचे लग्न 45 वर्षांच्या खुनी व्यक्तीशी लावले होते. तेव्हापासून वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत माहेरी राहिलेल्या मुलीने आता साठी पार केलेल्या नव-याकडे परतण्यास नकार दिला आहे. यामुळे तिने किमान एका रात्रीपुरते नव-याकडे जाण्याचा फतवा वैदू जात पंचायतीने काढला आहे. गुरुवारी श्रीरामपुरात ही बाब उघडकीस आली.
ताया लोखंडे (ता.राहुरी) याने 19९6 मध्ये गुप्तधनासाठी पुतण्याचा नरबळी दिला होता. या प्रकरणात त्याला शिक्षाही झाली. या दरम्यान पंचायतीने तायाच्या पत्नीचा विवाह जातीतील तरुणाशी लावून दिला. तुरुंगातून सुटून आल्यानंतर तायाने पंचायतीला पत्नीबाबत विचारले. त्यावर पंचायतीकडे उत्तर नव्हते. ‘मी बायकोला फारकत दिलेली नाही. त्यामुळे माझी बायको मला परत द्या’, असा लकडाच त्याने पंचांसमोर लावला. त्यावर पंचांनी भलतीच शक्कल लढवली. पत्नी गेली तर जाऊ दे, तुझा विवाह श्रीरामपूरच्या सुभेदार वस्तीवरील तिच्या 4 वर्षांच्या धाकट्या बहिणीशी लावून देऊ, असे पंचांनी म्हणताच तायाही तयार झाला. पंचांच्या साक्षीने लग्नही पार पडले.
वैदू रूढीनुसार बालविवाहानंतर मुलगी सज्ञान होईपर्यंत आई-वडिलांकडे राहते. ही मुलगी सतरा वर्षांची झाल्याने तायाने तिला घरी नेण्याची मागणी केली. मात्र, आता तायाने वयाची साठी ओलांडली असल्याने मुलीच्या आई-वडिलांसह सर्वच कुटुंबियांनी त्यास विरोध केला.जात पंचायतीने लादलेल्या या निर्णयाच्या विरोधात कुटुंबीय एकवटल्याने त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. पाच वर्षे त्यांना जातीबाहेर राहावे लागले. अखेर मुलीस पाठवण्यास संमती दर्शवल्यानंतर त्यांना पुन्हा जातीत घेण्यात आले. मात्र, यावेळी मुलीने स्वत: विरोध केला. त्यामुळे तिला पाठवण्यात आले नाही. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणात तडजोड करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, तोडगा निघेना. अखेर पंचांनी पुन्हा घात केला. मुलीला सासरी पाठवायचे नसेल, तर किमान एक रात्र तिला नव-याकडे पाठवावे, दुस-या दिवशी तिला फारकत घेऊन देतो असा निर्णय पंचांनी दिला.
जात पंचायतीच्या या फतव्यामुळे मुलीचे सर्व कुटुंबीय भयभीत झाले असून पोलिसात फिर्याद देण्यास धजावत नाहीत. दोन दिवसांपासून अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, विलास बढे, अ‍ॅड. रंजना गवांदे हे मुलीच्या संपर्कात असल्याने जातीतील अनेकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रारंभी कुणीही बोलण्यास तयार नव्हते. मात्र, अंनिसने दिलेल्या धीरामुळे गुरुवारी या प्रकरणाला वाचा फुटली.
15 वर्षांपासून कुटुंबाचा पंचांविरुद्ध लढा
जातपंचायतीच्या निर्णयाविरुद्ध नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुलीच्या घरच्यांना धीर दिला. मात्र, मुलीनेच प्रकरणाची माहिती देण्याची हिंमत दाखवली. ती म्हणाली, हा निर्णय म्हणजे माझ्यावर पंचायतीचा अन्याय आहे. याविरुद्ध 15 वर्षांपासून माझे कुटुंब लढत आहेत. माझे प्राण गेले तरी मी हा निर्णय मान्य करणार नाही. येत्या जात पंचायतीत न्याय न मिळाल्यास पोलिसांत जाणार आहे.