आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांमुळे आष्टीच्या बिस्मिलाची घरवापसी, सक्तीच्या विवाहाला केला होता विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - कुटुंबातील लोक नापसंत असलेल्या चुलत भावाबरोबर लग्नाची सक्ती करत असल्याचे पाहून शौचास जाण्याचा बहाणा करून तेरा वर्षांची बिस्मिला घराबाहेर पडली. आष्टी, अहमदनगर, औरंगाबाद, पुणेमार्गे रेल्वेने ती दिल्लीत पोहोचली. जवळील पैसे संपल्यानंतर दिल्लीत एका हॉटेलच्या परिसरात फिरताना महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दिल्ली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिची घरवापसी झाली आहे.

आष्टीतील मुर्शदपूर येथील सय्यद बादशहा सय्यद बशीर यांची तेरा वर्षांची मुलगी बिस्मिला ही ७ एप्रिल २०१५ रोजी घरातून सकाळी सात वाजता शौचास जायचे म्हणून बाहेर पडली. ती घरी परत आलीच नसल्याने कुटुंबातील लोकांनी तिचा शोध सुरू केला. शेवटी आष्टी ठाण्यात मुलीचे कोणीतरी अपहरण केले असावे, अशी तक्रार वडिलांनी दिली. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी मुलींच्या वडिलांची चौकशी केली, परंतु ते काहीतरी लपवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आष्टी बसस्थानकावरील कर्मचारी, कँटीनचे कर्मचारी यांचे जबाब नोंदवल्यानंतर मुलगी पहाटे चार वाजता आष्टी बसस्थानकाकडे कन्या शाळा, खडकत चौकमार्गे चालत गेली आणि त्या ठिकाणाहून नगरकडे गेल्याचे समजले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नगर येथून मुलगी औरंगाबाद येथे गेली.
औरंगाबाद येथून रेल्वेने बिस्मिला पुण्यात पोहोचली आणि पुण्यातून ती दिल्लीला गेली. १२ एप्रिल रोजी दिल्लीत सकाळी सहा वाजता चांदणी चौक परिसरात ती फिरत असताना मिळालेल्या माहितीवरून दिल्ली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. दिल्लीत चाइल्ड लाइनच्या मदतीने तिची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी तिची माहिती महाराष्ट्र पोलिसांना दिली. महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती आष्टी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. १२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मुलीचे नातेवाईक व पोलिस उपनिरीक्षक शशिकांत दोडके, हवालदार सुभाष मोटे हे दिल्लीला गेले. नवी दिल्ली येथील चांदणी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सरताज आनंद या तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. पोलिस व दिल्लीच्या चाइल्ड वेल्फेअर कमिटीसमोर नातेवाइकांनी मुलगी ताब्यात मिळण्यासाठी अर्ज केला. मुलगी ताब्यात घेतल्यानंतर आष्टी पोलिस व नातेवाईक आष्टीला आले. आष्टी पोलिसांनी त्या मुलीला बीड येथील चाइल्ड वेल्फेअर कमिटीकडे सुपूर्द केले. आता कमिटी त्या मुलीला वडिलांच्या ताब्यात देणार आहे. पसंत नसलेल्या चुलत भावाबरोबरच कुटुंबातील लोक लग्नाची सक्ती करत असल्याने मी पळून गेले असल्याचे बिस्मिलाने पोलिसांना सांगितले आहे. बिस्मिला ही मुर्शदपूर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होती. दोन वर्षांपूर्वी तिने शाळा सोडली.

रेल्वेत वृद्धाने दागिने घेतले
पुण्यातील रेल्वेस्थानकात पोहोचल्यानंतर बिस्मिला एका वृद्धाबरोबर दिल्लीपर्यंत गेली खरी, परंतु रेल्वेत त्या वृद्धाने तिच्या अंगावरील चांदीचे दागिने ठेवू नको तुला धोका होईल, असे सांगून तिच्याकडून दागिने घेऊन त्या बदल्यात तिला काही पैसे दिले. २२०० रुपयांतून तिने दोन दिवस दिल्लीत काढले, परंतु पैसे संपल्याने दिल्लीतील एका हॉटेलजवळ फिरत असताना ती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली.