आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Nagar Kopargaon Road Development Report, Aurangabad Bench Order

नगर-कोपरगाव रस्त्याच्या सद्यस्थितीचा अहवाल द्या, औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर-कोपरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व ए. एस. आय. चिमा यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.

या रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, तरीही टोलवसुली जोरात सुरू आहे. त्यामुळे नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी याविरोधात नोव्हेंबर 2012 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत चंगेडे यांनी संबंधित रस्त्याचे काम अपूर्ण असताना बेकायदेशीरपणे टोलवसुली सुरू असल्याचे नमूद केले. संबंधित ठेकेदाराची पात्रता नसताना त्याला काम दिल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याचे लेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात नमूद केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय खासगीकरणांतर्गत दिलेल्या कामांत पर्यावरणासंदर्भात गंभीर त्रुटी असल्याचे म्हणणे चंगेडे यांनी मांडले. त्याच्या पुष्ठय़र्थ त्यांनी या रस्त्याचे काम करताना तोडलेल्या झाडांच्या जागी दुसरी झाडे पुरेशी लावली नसल्याचे स्पष्ट केले. एक झाड तोडल्यावर दहा झाडे लावणे बंधनकारक असते, पण ठेकेदाराने ते केले नाही. तसेच जी झाडे लावली, त्यांची निगा न राखल्यामुळे ती जगली नाहीत, असे चंगेडे यांनी नमूद केले.

निगा राखली नसल्याने या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काम चांगले न केल्याने रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. रस्ता कोठेही समपातळीत नाही. साईडपट्टय़ांचे कामही करण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता निविदेच्या कलम 4।4 नुसार काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करता येत नाही. रस्त्याचे अद्याप 25 टक्के काम अपूर्ण आहे, पण ठेकेदार बळजबरीने टोलवसुली करत आहे. त्यामुळे कराराचा भंग झाल्याचा मुद्दा चंगेडे यांनी उपस्थित केला आहे.

या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायमूर्तींच्या द्विसदस्यीय खंडपीठाने अंतरिम आदेश देताना या रस्त्याच्या कामाची आजची स्थिती काय आहे, किती कामे अपूर्ण आहेत याची विचारणा करून त्याबाबत दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.