आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वन विभाग फुलवणार 862 हेक्टरवर हिरवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर वन विभाग यंदा 862 हेक्टर क्षेत्रावर 9 लाख 40 हजार वृक्षलागवड करून हिरवाई फुलवणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अरुण येलजाळे यांनी दिली. नगर वन विभागाने यंदा 11 लाख 40 हजार रोपे तयार केली आहेत. त्यातील एकट्या नगरच्या रोपवाटिकेत 3 लाख 30 हजार रोपे तयार आहेत. औरंगाबाद रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यालयाची मागील बाजू रोपवाटिकेने व्यापली असून, सर्वत्र हिरवाईचे साम्राज्य पसरले आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांतील या हिरवाईला जमिनीवर येण्याची प्रतीक्षा आहे.
नगर वन विभागाचे क्षेत्र 82 हजार हेक्टर आहे. वन विभागाने गेल्या दहा वर्षांत सुमारे एक कोटी वृक्षलागवड करून ती यशस्वी केली आहे. शिवाय जल आणि मृद संधारणाच्या क्षेत्रातही वन विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

उपवनसंरक्षक गोविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे यांनी आपल्या कर्मचार्‍यांकडून किमान 35 प्रकारच्या झाडांची रोपे तयार करून घेतली. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणांहून बी मागवले. रोपांना लागणारे खत तयार करण्यासाठी कंपोष्ट खतही कार्यालयातच तयार केले जात आहे.

यंदा कडूनिंब, आंबा, वड, पिंपळ, उंबर, लक्ष्मीतरू, शिसू, सीताफळ, वावळा, अर्र्जुन सादडा, बहावा, करंज, बेल, कवठ, शिवण, हिरडा, बेहडा, हिवर, जांभूळ, आवळा, आंबा, तेटू, शिरस, बिजा, आपटा, खैर, कांचन, भेंडी, बांबू आदी देशी झाडांबरोबरच गुलमोहोर, नीलमोहोर, काशीद, पेल्टोफोरम, रेन ट्री या विदेशी झाडांची रोपे तयार केली. ही रोपे किमान एक ते तीन फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहेत. वनरक्षक स्वाती सावंत व त्यांच्या सहकार्‍यांनी काळजीपूर्वक ही रोपे वाढवल्याने हा परिसर हिरवागार झाला आहे.

वरील रोपांपैकी एक लाख रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत 2 लाख 55 हजार रोपे नेवासे तालुक्यातील मुकिंदपूर, लोहगाव, राजेगाव, नगर तालुक्यातील जेऊर, विळद, देहरे बारदरी, गुंडेगाव येथील सर्व मिळून 240 हेक्टर वनक्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल देवखिळे यांनी दिली.
सर्वत्र हिरवाईचा प्रयत्न
४जिल्ह्यात हिरवाई फुलवण्याचे आव्हान वन विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. अलीकडील काळात वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करणे हे मोठे आव्हान असते, तरीही दरवर्षी आम्ही आमचे उद्दिष्ट पूर्ण करतो. वन विभागाने लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण मोठे असल्याने जिल्ह्यात हिरवाई वाढत आहे. ’’
बी. आर. कदम, सहायक वनसंरक्षक, अहमदनगर वन विभाग.
वन विभागातील रोपवाटिका
नगर, भिंगार, बारागाव नांदूर (ता. राहुरी), वडगाव सावताळ (ता. पारनेर), म्हैसगाव (ता. राहुरी), मढी (ता. पाथर्डी), पाथर्डी. या वर्षीपासून श्रीगोंदे तालुक्यातील देऊळगाव व बेलवंडी येथील रोपवाटिका बंद झाल्या आहेत. कारण श्रीगोंदे तालुक्यातील सर्व क्षेत्र वन्यजीव विभागाकडे वर्ग होणार आहे. तेथे रोपांची लागवड होणार नाही. कारण त्या भागात आता गवताळ पट्टा विकसित करण्यात येणार आहे.
फोटो - नगर वनविभागाच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली तीन लाख रोपे यंदाच्या पावसाळ्यात लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत.छाया : गजानन कुलकर्णी