आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goa Information Commissioner Speak At Nagar, Divya Marathi

कार्यकर्ते व अधिकार्‍यांना एकमेकांना समजून घेता आले पाहिजे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विविध कायदे करून घेण्यासाठी आंदोलने जशी आवश्यक आहेत, तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चांगले प्रशासनही गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना उत्तम प्रशासक आणि प्रशासकांना कार्यकर्त्याच्या भूमिकेत जाता आले पाहिजे, असे मत गोवा राज्याच्या माहिती आयुक्त तथा सामाजिक कार्यकर्त्या लीना मेहंदळे यांनी व्यक्त केले.
स्नेहालय युवा निर्माण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मेहंदळे यांच्यासह ‘सत्यमेव जयते’च्या संशोधन विभागप्रमुख स्वाती भटकळ, संज्ञापन तज्ज्ञ सुषमा दातार (पुणे), संयोजक डॉ. सतीश राजमाचीकर, अभिनेते रवींद्र मंकणी व मिलिंद शिंदे आणि परीक्षक कामोद खराडे यांच्याशी गीता देशमुख यांनी संवाद साधला.

‘सत्यमेव जयते’मुळे भारतात एक प्रेरणा पर्व सुरू झाले आहे. हे अभियान म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रबोधनात्मक मालिका नसून देशात पायाभूत परिवर्तनाचे एक सातत्यपूर्ण अभियान असल्याचे स्वाती भटकळ यांनी सांगितले.यापुढील काळात संवेदनशील आणि परिवर्तनाची आस असणार्‍या लोकांना एक सुत्रात गुंफून देशहिताच्या प्रेरक कृती करण्याचा सत्यमेव जयते टीमचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सत्यमेव जयते फाउंडेशन
‘सत्यमेव जयते’च्या कार्याची ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी स्नेहालयच्या वतीने सत्यमेव जयते फाउंडेशनची स्थापना करून पुढील वर्षीचा सत्यमेव जयते दिन राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणार आहे. स्नेहालयच्या कार्याची ओळख करून देणार्‍या राजीव सिंग लिखित ‘डिफाइंड डेस्टीनिज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. मूळ मराठी पुस्तकावर आधारित ‘अंधाराशी दोन हात’ या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा डॉ. राजमाचीकर यांनी यावेळी केली.
सत्यमेव जयते दिनानिमित्त आयोजित लघुपट महोत्सवात महिला, बालक, भ्रष्टाचार, पर्यावरण आणि युवक या पाच विभागांतील अनुक्रमे मुरळी मी देवाची (दादासाहेब शेळके, नगर), शूटर (तेजस जोशी, कल्याण), पाच रुपये (अक्षय वारे, शिरूर), थेंबे थेंबे (विशाल कुंभार, मुंबई) आणि विहीर गल्ली (संदीप मेढे, नाशिक) या लघुपटांनी प्रथम क्रमांकाचे 20 हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पारितोषिक पटकावले.
40 फूट (हेमंत औताडे, पुणे), कुर्बान (अजय ओरॉन, अमन जहॉ, झारखंड) आणि कर भला (विश्वनाथ रथ, चेन्नई) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. धाडस (पुष्कर माने, पाचगणी), वृत्ती (प्रियंका सातपुते, नगर), पाणी (रंगनाथ उबाळे, नगर), आणि कट द रोप (मनीष गुप्ता, गोरखपूर) या लघुपटांना स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाले. ती (पौर्णिमा पांचाळ, मालाड), आईने से (भूषण मंजुळे, नगर), भंगारवाले (अजय थोरात, नगर), अनुकरण (नितीन पवार, नवी मुंबई), डोनेशन बॉक्स (मनीष गुप्ता, गोरखपूर) आणि संस्कार (प्रशांत टेमक, नगर) या लघुपटांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

यावेळी डॉ. दिनेश वर्मा (लंडन), संदीप काकडे (पुणे) यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभिजित क्षीरसागर, गजेंद्र क्षीरसागर, अभय गोले, नीहार कुलकर्णी आणि संतोष बडे यांनी परिचय करून दिला. पारितोषिक वितरणानंतर शिवाजी वाइचळ लिखित-दिग्दर्शित ‘उल्लागड्डी’ ही एकांकिका सादर करण्यात आली.