आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसर्‍याला मिळणार सोन्याला झळाळी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून खरेदीसाठी आता सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. दसरा सणासाठी सराफ दुकानांत विविध प्रकारचे अलंकार विक्रीसाठी आलेले आहेत. पारंपरिक दागिन्यांसोबतच फॅन्सी दागिन्यांनाही मागणी राहणार आहे. यामुळे दसरा या सणाला सोने खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव घसरला आहे, तर रुपया मजबूत झाला आहे. प्लॉट व विमा क्षेत्रापेक्षा सोन्याची गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे भारतीयांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. सध्या सोन्याच्या भावात चढ-उतार होत आहे. मात्र, दसर्‍यापर्यंत सोन्याचा भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. दसर्‍याच्या दिवशी सोन्याला झळाळी मिळेल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे सोने खरेदीत 30 टक्क्यांची घट झाली होती. यावर्षी मात्र जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे ही घट भरून निघण्याची चिन्हे आहेत.

गेल्या महिन्याभरापासून आर्थिक मंदी आणि पितृपक्ष यामुळे सराफ बाजारात सोने खरेदी मंदावली होती. नवरात्रोत्सवापासून सराफ बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. दसर्‍यासाठी विविध प्रकारची आभुषणे विक्रीसाठी आलेली आहेत. शहरात 350 सराफ दुकाने आहेत. यात 250 कारागीर काम करतात.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोन्याचा भाव 33 हजार 300 वर गेला होता. यंदा त्यात तीन हजारांनी घसरण झाली आहे. मंगळवारी (8 ऑक्टोबर) दहा ग्रॅम सोन्याला 30 हजार 300 रुपये असा होता, तर बुधवारी (9 ऑक्टोबर) सोन्याचा भाव 30 हजार 500 रुपये, तर चांदीचा भाव किलोमागे 51 हजार आहे. गेल्या महिन्यात चांदी 56 हजारांवर गेली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत चांदीच्या भावात काही प्रमाणात घसरण होत आहे. महिलांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची क्रेझ कायम आहे. आर्टिफिशियल दागिन्यांऐवजी सोन्यांच्या दागिन्यांना मागणी कायम आहे. सराफ बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठय़ा उलाढालीची अपेक्षा सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.