नगर - जेऊर येथे सराफी व्यवसाय करणार्या सत्यम शांतीलाल वर्मा (३६, सुखकर्ता अपार्टमेंट, पाइपलाइन रोड) यांचा धारदार हत्याराने खून करण्यात आला. औरंगाबाद रस्त्यावरील दावल मलिक डोंगर पायथ्यालगत मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.
वर्मा यांची जेऊर येथे सराफी पेढी आहे. सोमवारी रात्री दुकान बंद करून ते मोटारसायकलवरून घरी येण्यास निघाले. रात्री उशिरापर्यंत ते घरी पोहोचले नाही. कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दावल मलिक डोंगर पायथ्यालगत बेवारस मृतदेह आढळून आल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले असता, मृतदेह वर्मा यांचा असल्याचे उघड झाले. त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांची मोटारसायकल वांबोरी शिवारातील हॉटेल ड्रीमजवळ सापडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपअधीक्षिका डॉ. अनिता जमादार, निरीक्षक शशिराज पाटोळे एमआयडीसीचे राहुल पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली. सुंदरम वर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.