आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी हद्दपारीने सोन्याचे दर आणखी आवाक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंधरादिवसांपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्याने शहरी भागातील सोन्याचे दर प्रतितोळा सुमारे अडीचशे रुपयांनी कमी झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी ३२ हजारांवर पोहोचलेले दर आता दहा ग्रॅमला २५ हजार २०० पर्यंत खाली उतरले आहेत. जागतिक बँकांचे व्याजाचे दर वाढण्याच्या भीतीने दरात घसरण सुरू झाली. सर्वसामान्य नागरिकांना मात्र या घसरणीमुळे मोठा दिलासा मिळाला. जागतिक बँकांच्या धोरणांमुळे सोन्याच्या दरात सुरू असलेला हा चढउतार आणखी काही आठवडे कायम राहणार आहे. त्यातच ऑगस्टपासून एलबीटी रद्द झाल्याने शहरी भागातील सोन्याचे दर आणखी आवाक्यात आले आहेत.
मनपा हद्दीतील दुकानात सोने खरेदी केल्यास प्रतितोळा अडीचशे रुपये एलबीटी द्यावा लागे. दुकानदार हा एलबीटी बिलामध्ये स्वतंत्र दाखवे. त्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत असे. परिणामी ग्रामीण भागातील ग्राहकांनी शहरातील सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती. हे ग्राहक श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सोने खरेदी करत. आता मात्र एलबीटी रद्द झाल्याने हा ग्राहक वर्ग पुन्हा एकदा शहरातील सराफ बाजाराशी जोडला जाणार आहे. रविवारी सोन्याचा दर (एलबीटी वगळून) प्रतितोळा २५, २०० रुपये होता.