आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगमनेरात अडीच लाखांचा ऐवज लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- संगमनेरलगत असलेल्या गोल्डन सिटी या वसाहतीत चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भावंडांना चोरट्यांनी लोखंडी शस्त्राने वार करत जखमी केले. देवघरातील कपाट फोडत त्यातील सुमारे अडीच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी पहाटे घडली.
गोल्डन सिटीमधील शेटीबा बाळा पवार यांच्या बंगल्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास चार-पाच जणांनी प्रवेश करत देवघराला असलेले कुलूप तोडून कपाटातून सुमारे अडीच लाख किमतीचे चांदीचे दागिने व रोकड लंपास केली.
दरम्यान, देवघरात होत असलेल्या आवाजाने जागे झालेल्या सुनील व अनिल या दोघा भावंडांनी घरात घुसलेल्या चोरांना प्रतिकार करत त्यातील एकाला पकडले. त्यामुळे संतापलेल्या चोरट्यांनी सुनील याच्या डोक्यात लोखंडी टामीने जोराचा वार केला. अनिल याच्यावरही हल्ला करून आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान, आरडाओरडीने जागे झालेल्या शेजारचे नागरिक व घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी जवळच्याच एका रस्त्याने नाशिक-पुणे महामार्गावरून पसार झाले. घटनास्थळी आलेल्या श्वान पथकाने या रस्त्यापर्यंत आरोपींचा माग काढला. ठसे तज्ज्ञांचीही मदत पोलिसांनी घेतली. मात्र, त्यांना आरोपीचा थांगपत्ता लागला नाही. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे, पोलिस उपअधीक्षक प्रताप पवार, निरीक्षक श्याम सोमवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली.
गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांच्या दहशतीमुळे संगमनेरकर अक्षरश: रात्र जागून काढत आहेत. अपूर्ण मनुष्यबळामुळे पोलिस देखील संपूर्ण शहरात गस्त घालू शकत नसल्याने पोलिसांविषयी संतापाची भावना आहे. पवार यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चोरीच्या दोन दुचाकींचा वापर
या चोरट्यांनी गुन्ह्यात जवळच्याच राहणे मळा परिसरातील दोन दुचाकींची चोरी करून त्याचा वापर या चोरीसाठी केल्याचे समोर आले. पवार यांच्या बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी या दुचाकीवरून तेथे येत बंगल्यात चोरी केली. दरम्यान, मारहाणीमुळे ओरडलेल्या पवार यांच्या आवाजाने लगतचे शेजारी जागे झाल्याने त्यांनी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला.