आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिका कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीमसह पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापौर सुरेखा कदम यांनी शनिवारी घेतला. यंदा प्रथमच कोणतेही आंदोलन करता सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार अाहे. महापौर कदम यांनी तातडीने बैठक बोलावून कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न सोडवला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महापालिका कर्मचारी संघटनेने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने १४ ऑक्टोबरला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर कदम यांना मिळाली. कदम यांनी संघटना पदाधिकाऱ्यांची समजूत काढत सानुग्रह अनुदानाचा प्रश्न तत्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कदम यांनी शनिवारी प्रशासनाची बैठक घेतली. उपमहापौर श्रीपाद छिंदम, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, सभागृहनेते अनिल शिंदे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, उपायुक्त अजय चारठाणकर, संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे आदी उपस्थित होते. महापौर कदम यांनी महापालिकेच्या अर्थिक परिस्थितीची माहिती घेतली. कर्मचाऱ्यांना यापूर्वीच दहा हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आलेला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही दहा हजार रुपये देण्यात येतील. संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांनी सानुग्रह अनुदान वाढून मिळण्याची मागणी केली. परंतु महापालिकेची अार्थिक परिस्थिती पाहता दहा हजार रुपये अग्रीमसह पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापौर कदम यांनी घेतला. दरवर्षी मनपा कर्मचारी संघटनेला सानुग्रह अनुदानासाठी आंदोलन करावे लागते, यंदा मात्र महापौर कदम यांनी तातडीने निर्णय घेऊन सानुग्रह अनुदानाचा प्रश्न तत्काळ सोडवला. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...