आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Miss To Enter In Congress : Patangrao Kadam

गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश मध्यंतरी हुकला!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी (जि. नगर) - गोपीनाथ मुंडे हे चुकून भाजपमध्ये आहेत, तर भुजबळ सध्या राष्‍ट्रवादीत गुदमरले आहेत. मुंडे व आमचे मध्यंतरी जुळले होते. मात्र, आमच्यातीलच काहींना मुंडे पक्षात आल्यास आपले काय होईल, असा प्रश्न पडल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश हुकला, असा गौप्यस्फोट वनमंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी भगवान गडावर (ता. पाथर्डी) केला.
भगवानबाबा यांच्या 48 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मुंडे यांचा अडचणीचा काळ आता संपला आहे. त्यांचा व माझा जुना संबंध आहे. कोणाच्या नशिबात पुढे काय आहे ते आपण सांगू शकत नाही. मात्र, ते मोठे झाल्यास आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत.
खडसे म्हणाले, मुंडे हे जातीपातीच्या राजकारणापलीकडील नेते आहेत. त्यांना उज्ज्वल भविष्य आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. आगामी काळात तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील.

माझे राज्यातही लक्ष : मुंडे
गोपीनाथ मुंडे म्हणाले, आपल्याला पुन्हा खासदार व्हायचे आहे. मात्र, आपण राज्यातही लक्ष देत आहोत. व्यासपीठावर बसलेले सर्वच नेते मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहेत. त्यांना न जमल्यास माझा विचार अवश्य करा. पतंगराव आज मूडमध्ये आहेत. भुजबळ माझे मोठे बंधू आहेत. कदम यांना भुजबळ गुदमरलेले वाटत असले तरीही ते तसे नाहीत.