आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde And Vikhe News In Marathi, Dilip Gandhi, Rajeev Rajale, Divya Marathi

मुंडे, विखेंच्या अनुपस्थितीने गांधी व राजळे यांच्यापुढे अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे नगरकडे शेवटपर्यंत फिरकले नसल्याने उमेदवार राजीव राजळे व दिलीप गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दोन्ही मातब्बर नेते नगरच्या प्रचारापासून दूर राह्यल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


नगर लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब विखे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. गेल्या वेळच्या निवडणुकीत विखे यांच्या यंत्रणेची गांधी यांना मदत झाली होती. यावेळी त्यांची यंत्रणा तिस-या आघाडीचे उमेदवार बी. जी. कोळसे यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजून त्यांच्याकडून कोणताही आदेश आला नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्याकडून ठोस संदेश येण्याची शक्यता व्यक्त करताना या सूत्राने कोळसे यांना मदत करण्यास सांगितले जाण्याची सर्वाधिक शक्यता व्यक्त केली.


कोळसे यांच्या उमेदवारीमागे बाळासाहेब विखे यांचाच हात असल्याची चर्चा अगदी सुरुवातीपासून आहे. त्यामुळेच ते आघाडीचे उमेदवार राजळे यांच्या प्रचाराला आले नसल्याचा सूर आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. काँग्रेस-राष्‍ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी बैठक घेऊन परस्पर सहकार्य करण्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार शिर्डी मतदारसंघात राष्‍ट्रवादीच्या नेत्यांनी वाकचौरे यांच्या प्रचारात सहकार्य केले नसल्याचे सांगण्यात येते. या कारणामुळेच शेवटच्या टप्प्यात शिर्डी मतदारसंघात सक्रिय झालेले विखे नगरकडे फिरकले नाहीत.


शेजारच्या बीड लोकसभा मतदारसंघात व्यग्र असलेले गोपीनाथ मुंडे एकदाही नगर मतदारसंघात आले नाहीत. गांधी यांच्या उमेदवारीला त्यांचा आधीपासूनच विरोध होता. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीच नव्हे, तर नरेंद्र मोदी यांच्या सभेकडेही त्यांनी पाठ फिरवली.


पाथर्डी येथे होणारी शेवटच्या टप्प्यातील मुंडे यांची सभा रद्द झाली आहे. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात मुंडे यांना मानणारा मतदार आहे. मुंडे यांच्या सभेतून या मतदारसंघात भाजपला चैतन्य येण्याची शक्यता होती. मात्र, मुंडे यांनी पाठ फिरवल्याने गांधी यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यांच्या न येण्यामागे गांधी यांना असलेला त्यांचा विरोध प्रकर्षाने पुढे आला आहे. मोदी लाटेवर स्वार झालेल्या गांधी यांना मुंडे यांच्या विरोधाचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषत: वंजारी समाजाची व ऊसतोडणी कामगारांच्या मतांवर परिणाम होणार आहे.