आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव - पाथर्डीतून भाजपचा आमदार करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- राज्याचा मी मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल, तर पाथर्डी - शेवगावमधून भाजपचा आमदार निवडून द्या, असे आवाहन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित भाजपच्या सर्वच सदस्यांना त्यांनी कानपिचक्या दिल्या.

पाथर्डीतील यशश्री डेव्हलपर्सच्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण व श्रीसाई कर्मशिअल कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन सोमवारी मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी खासदार दिलीप गांधी होते. या वेळी आमदार पंकजा पालवे-मुंडे, प्रज्ञा मुंडे, माजी आमदार बाबुराव पाचरणे, चंद्रशेखर कदम, दगडू पाटील बडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, जिल्हा परिषदेच्या महिला व समाज कल्याण सभापती हर्षदा काकडे, तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गज्रे, महिला तालुकाध्यक्ष अश्विनी केकाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, अशोक गज्रे, सोमनाथ खेडकर, नगरचे माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे आदी उपस्थित होते.

भगवानगडावरील मेळाव्यात आपण पुन्हा लोकसभा लढवणार, असे संकेत देणार्‍या मुंडे यांनी आज आपला पवित्रा बदलला. मुख्यमंत्री व्हायचे असल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपण मावशी मानत असलेल्या पाथर्डी मतदारसंघातून भाजपचा आमदार करा, असे आवाहन त्यांनी केले. मला मुख्यमंत्री होण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, यासाठी तुमची एकजूट आवश्यक आहे. कोण गाडीच्या काचा खाली करत नाही, नमस्कार करत नाही व भेटत नाही या सर्व गोष्टी बाजूला ठेवा. आता तरी एक होणार की नाही, असा प्रश्‍न त्यांनी माजी आमदार दगडू पाटील बडे यांना विचारला. त्यावर बडे यांनी मला विधानसभेला संधी दिल्यास उभे राहू असे सांगताच मुंडे यांनी ‘तुम्ही एकदा झेंडा लावला आहे’ अशी फिरकी घेतली. सध्या राष्ट्रवादीत असलेल्या सोमनाथ खेडकर यांना उद्देशून उगीच इकडे-तिकडे फिरकू नका, असा सल्ला मुंडे यांनी दिला. प्रताप ढाकणे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संतोष गुगळे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश पालवे यांनी केले. सुरेश गुगळे यांनी आभार मानले. मुंडे यांनी नंतर ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली.

बारामतीत एल्गार यात्रा

तालुक्यात माझ्या शब्दाबाहेर कोणी नाही. जे नाराज असतील त्यांना घेऊन माझ्याकडे या. मी सर्वांची नाराजी दूर करतो. येत्या 15 ऑक्टोबरला बारामती येथून एल्गार यात्रेला सुरुवात करणार्‍या आमदार पंकजा मुंडे यांच्या सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहा. एमसीए निवडणुकीतील अर्ज बाद केल्याच्या विरोधात आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे, असे मुंडे यांनी यावेळी सांगितले.