आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, BJP, Beed Lok Sabha Constituncy, Divya Marathi

मी उभा आहे असे समजून मतदान करा, गोपीनाथ मुंडे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर मतदारसंघात मी स्वत: उभा आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डीजवळील शिरूर (जि. बीड) येथे केले, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख स्वानंद नवसारीकर यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुंडे यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे पवार यांनी बीडची जागा प्रतिष्ठेची केली आहे. पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस बीडमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे मुंडे बीड सोडून बाहेर पडू शकत नाहीत. पाथर्डी येथील त्यांची सभा याच कारणामुळे रद्द झाली. असे असले तरी त्यांनी पाथर्डीतील काही प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा करून दिलीप गांधींना निवडून देण्यास सांगितले आहे. एका व्हीडीओ क्लीपद्वारेही मुंडे यांनी तसे आवाहन केले आहे. ही क्लीप सोशल मीडियातून मतदारांपर्यंत पोहचली आहे.


मुंडे व गांधी यांच्यात वाद असल्यामुळेच मुंडे यांची पाथर्डी येथील सभा रद्द झाली, असा अपप्रचार विरोधक करत होते. मात्र, मुंडे यांनी स्वत:च शिरूर येथील सभेत गांधी यांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे विरोधक करत असलेल्या अपप्रचारात काही तथ्य नाही. उलट राजीव राजळे हे मुंडे यांना त्रास देणार्‍या पवार गटातील उमेदवार आहेत. त्यांनीच धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊन मुंडे यांचे घर फोडण्याचा घाट घातला. प्रताप ढाकणे यांनादेखील राजळे यांनी फोडले असून हा घाव मुंडे यांच्या जिव्हारी लागला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.


विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली
ज्यूसची गाडी चालवून मी लहानाचा मोठा झालो. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेतले. त्यामुळेच भाजपने मला आपलेसे केले. हा इतिहास शहरासह संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर विरोधकांकडून होणारे जातीच्या राजकारणाचे आरोप खोटे व हीन पातळीचे असल्याचे दिलीप गांधी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. माझ्यावरील आरोप शहराच्या प्रतिमेला तडा पोहोचवणारे आहेत. नगरसेवक पदापासून सुरू झालेली माझी राजकीय कारकीर्द केंद्रीय राज्यमंत्रिपदापर्यंत पोहोचली. या काळात माझ्यावर कधीच जातिवादाचा शिक्का बसला नाही. त्यामुळे अशा खोट्या आरोपांवर सुज्ञ मतदार कधीच विश्वास ठेवणार नाही, असे गांधी यांनी म्हटले आहे.