आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, Lunch Diplomacy, Divya Marathi

मुंडेंचा ‘लंच डिप्लोमसी’चा प्रयत्न बारगळला, ढाकणे यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये, यासाठी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी अँड. प्रताप ढाकणे यांच्याशी ‘लंच डिप्लोमसी’ करणार होते. त्यासाठी त्यांनी रविवारी (23 मार्च) दुपारी भगवानगडावर फिल्डिंग लावली होती. मात्र, अँड. ढाकणे यांच्या व्यूहनीतीमुळे हा प्रयत्न बारगळला. नंतर भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मुंडे यांचा ताफा त्यांच्या मतदारसंघाकडे मार्गस्थ झाला.


मुंडे यांना सध्या बीड मतदारसंघात विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि पक्षातही कोंडमारा होत आहे. वंजारी समाजाचे नेतृत्व म्हणून मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी बबनराव ढाकणे यांनी असे नेतृत्व केले होते. शरद पवार व अजित पवारांनी आगामी विधानसभा डोळ्यापुढे ठेवत स्वत:ला भावी मुख्यमंत्री म्हणवणार्‍या मुंडे यांना परळीतच तळ ठोकायला लावणारी खेळी रचली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर अँड. ढाकणे यांना राज्यस्तरावर संघटनात्मक कामात वापरण्यासाठी विधान परिषदेचे सदस्यत्व दिले जाणार आहे. मुंबईत गेल्या पंधरवड्यात झालेल्या बैठकीचा संदेश घेऊन आमदार बबनराव पाचपुते 20 मार्चला रात्री पाथर्डीत आले होते. ढाकणेंशी चर्चा करून त्यांनी पवारांना त्यांच्या भावना कळवल्या. तत्पूर्वी आमदार चंद्रशेखर घुले, ढाकणे यांनी मुंबईत पवारांची भेट घेऊन एकत्रित काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.


अजित पवारांशी चर्चा होऊन सर्व नियोजन झाले, हे मुंडे यांना समजताच त्यांनी ढाकणेंशी चर्चा करून ठोस आश्वासन देण्याचा निर्णय घेऊन भगवानगड गाठले. अर्ज दाखल करण्यापूर्वी बाबांच्या दर्शनाला आल्याचा कांगावा त्यांनी केला. बीड मतदारसंघातील गोंधळाचे वातावरण व तणाव मुंडेंच्या देहबोलीतून जाणवत होता. त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना बीडमध्ये प्रचाराला येण्याची विनंती केली. अँड. ढाकणे यांचा विषय एका कार्यकर्त्याने छेडण्याचा प्रयत्न केला असता मुंडे यांनी बगल देत बीडचा विषय काढला. ढाकणे आले नाहीत, याची सल त्यांची अस्वस्थता वाढवणारी ठरली. ढाकणे यांनी तूर्त अन्य मतदारसंघात लक्ष घालू नये. साखर कारखानदारीच्या विषयावरील गोपनीय चर्चा जाहीर करू नये, अशी मुंडे यांची अपेक्षा आहे.


मुंडे आता तोडणी कामगारांचे नेते राहिले नाहीत, तर साखरसम्राट झाले आहेत. या मुद्दय़ावर भर देत ढाकणे आता पुन्हा ऊसतोडणी कामगारांच्या संघटनात्मक कामात लक्ष घालून मुंडे यांच्या बलस्थानाला तडा देण्याची नीती आखत आहेत. ओबीसी तोंडावळा वाढवण्यासाठी जितेंद्र आव्हाडानंतर पवार यांनी ग्रामीण बाज असलेल्या ढाकणेंना जवळ केल्याने मुंडेंची अस्वस्थता वाढली आहे.