आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde Speaking About Journalist Protection Act

पत्रकार संरक्षण कायदा युती करेल- गोपीनाथ मुंडे यांचे ठाण्यात आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्रात व राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा करण्यास आम्ही बांधील राहू, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिले. ठाणे येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन झाले. याप्रसंगी मुंडे बोलत होते. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद घोळवे, संघटक संजय भोकरे, वृत्तवाहिनी विभागप्रमुख रणधीर कांबळे, किसन कथोरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे आदी उपस्थित होते.

पत्रकार संरक्षण कायदा करण्यात आघाडी सरकार खोडसाळपणा करत आहे. हा कायदा करण्यास ते असर्मथ आहेत. अनेकवेळा गृहमंत्र्यांनी कायदा करण्याचे अभिवचन दिले, ते प्रत्यक्ष कृतीत आणले नाही. त्यामुळे पत्रकारांच्या अधिवेशनाला जाऊन काय सांगायचे, असा प्रश्न त्यांना पडला असावा. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असूनही पत्रकारांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. युतीचे सरकार आल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी मी ताकद पणाला लावेन, असे मुंडे यांनी सांगितले.

निवडणुकांच्या काळात पत्रकारांना वापरून घेतले जाते, असे सांगून मुंडे म्हणाले, पत्रकारांना विविध क्षेत्रांत नोकरीत प्राधान्य द्यावे यासह सर्व मागण्या युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही मार्गी लावू. त्यासाठी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करून सर्वांना न्याय द्यावा.

यावेळी सचिन धर्माधिकारी यांना क्रांतिदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, पत्रकारांना वसाहत व पत्रकार भवन मिळावे, शिर्डी येथील पत्रकार भवनासाठी राज्य सरकारकडून जागा मिळावी, सर्वच क्षेत्रांत आरक्षण मिळावे यासह विविध ठरावांचे वाचन आरोटे यांनी केले.

नगर जिल्ह्यासह राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळावे ही मागणी राज्यभरातील पत्रकार संघटनांनी लावून धरली आहे. आघाडी सरकारने अद्याप या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे मुंडे यांच्या आश्वासनानंतर महायुतीच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पत्रकार संघटनांनी एकत्र यायला हवे..
राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी हेवेदावे बाजूला ठेवून संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. राज्यभर दौरे करून संघटना राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.’’ गोविंद घोळवे, अध्यक्ष, पत्रकार संघ.