आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धिबागेत उलगडणार शिल्परूपात गौतम बुद्धांचा जीवनपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गौतम बुद्धांच्या आयुष्यातील प्रसंग असलेला बौद्ध विहार नगरच्या सिद्धिबागेत साकारत आहे. तेथील शिल्पांचे काम युवा शिल्पकार विकास प्रकाश कांबळे यांनी केले आहे. या विहाराचे उद्घाटन लवकरच होईल.

गौतम बुध्द यांचा पुतळा असलेल्या जागेत नव्याने बौद्ध विहार तयार करण्यात आला आहे. चार स्तंभ असलेल्या या घुमटाकृती वास्तूच्या समोरील दोन स्तभांवर वरील बाजूस गौतम बुद्धांचा जीवनपट असलेल्या शिल्पपट्टीची निर्मिती कांबळे यांनी केली आहे. या खांबांची उंची साडेनऊ फूट असून त्यावर उभी बुद्धमूर्ती व कमळाच्या फुलांची सजावट आहे. 22 फूट लांब व दीड फूट रूंद पट्टीवर गौतम बुद्धांच्या जन्माआधी त्यांच्या आईला पडलेल्या स्वप्नापासून ते महानिर्वाणापर्यंतचे निवडक 19 प्रसंग दाखवण्यात आले आहेत.

मागील तीन महिन्यांपासून विकास कांबळे यांनी दिवस-रात्र एक करून फायबर ग्लासमधील ही कलाकृती साकारली आहे. त्यासाठी त्यांना शिल्पकार असलेले वडील प्रकाश यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. हे शिल्प तयार करण्यापूर्वी गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्राचा सखोल अभ्यास करून त्यातील प्रसंग कसे घडले असतील हे त्यांनी दृश्यरूपात साकारले. चंद्राच्या कला, सूर्य, मासा, पक्षी, इंद्रधनुष्य, पिंपळाची पाने असे असंख्य बारीकसारीक तपशील त्यांनी या शिल्पात उतरवले आहेत. त्यामुळे ही शिल्पे जिवंत झाली आहेत. बौद्ध विहाराच्या प्रवेशद्वारावर सांची येथील स्तूपासमोर असलेली कमान हुबेहूब तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सध्या विकास करीत आहेत. नगरला येणार्‍या पर्यटकांसाठी हा बौद्ध विहार नवे आकर्षण ठरणार आहे.