आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कर्मचार्‍यांच्या बारा मोटारसायकली पेट्रोल टाकून जाळल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा पोलिस अधीक्षक चौकातील सरकारी कर्मचारी वसाहतीतील 12 मोटारसायकली बुधवारी (11 डिसेंबर) मध्यरात्री जाळण्यात आल्या. या जळीत कांडामागील निश्चित कारणे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कर्मचारी वसाहतीतील कावेरी इमारतीत रजनी दत्तात्रेय ताठे या मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास जेवण करत होत्या. त्यांना अचानक फटाक्यांचा आवाज आला. त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली असता पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोटारसायकली आगीने वेढल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. पाणी टाकून आग शमवण्याचा प्रयत्न झाला. काहींनी वरच्या मजल्यावरून पाइपमधून पाण्याचा मारा केला. पण आग आटोक्यात येत नव्हती. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केल्यानंतर त्यांनी आग शमवली. मात्र, तोपर्यंत बारा मोटारसायकली जळून खाक झाल्या होत्या. काही कर्मचार्‍यांनी न पेटलेल्या मोटारसायकली बाजूला केल्या. त्यामुळे मोठे नुकसान टळले.
रजनी ताठे, नलिनी पाटील, संतोष पवार, रमेश पाटील, महादेव डोंगरे, अण्णासाहेब भिंगारदिवे, रफिक फकीर मोहम्मद पठाण, महेंद्र पवार, प्रताप गोसलवार यांच्या मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. हीरो होंडा स्प्लेंडर, टीव्हीएस, व्हेगो, करिज्मा, होंडा शाईन मोटारसायकलींचा यात समावेश आहे.
तोफखाना पोलिसांनी परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवले आहेत. समाजकंटकांची माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, ठोस माहिती हाती लागली नाही.
परस्पर वैमनस्यातून हा प्रकार झाला असावा. पोलिस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.