आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने शेवगावकरांना बनवले एप्रिल फुल..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - शेवगाव ग्रामपंचायत बरखास्त करून शेवगावला नगरपालिका करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने शेवगावकरांना मात्र सरकारने एप्रिल फुल बनवले. यामुळे शेवगाव शहरासह तालुक्यात भाजप-सेना युती सरकार विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेवगाव ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका करावी यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, व्यापारी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात अनेक आंदोलन केली. न्यायालयात ही दाद मागितली. त्यानंतर गत सरकारच्या काळात राज्यातील १३६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायत, नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्याने राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना युती सरकारने त्याची अंमलबजावणी केली. मात्र, पालकमंत्री जिल्ह्यातील असून तसेच शेेवगाव, नेवासे विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही आमदार भाजपचे असताना शेवगाव-नेवासे ग्रामपंचायती बरखास्त करून नगरपालिका करण्यास विलंब होत आहे.

शेवगाव नगरपालिका होणे ही राजकीयदृष्ट्या आमदार मोनिका राजळे यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. यासाठी त्यांनी सरकार दरबारी वजन वापरणे आवश्यक आहे.
शेवगाव नगरपालिका व्हावी ही गेल्या २०-२५ वर्षांपासूनची शेवगावकरांची मागणी आहे. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही या उक्तीप्रमाणे शेवगावकरांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत नगरपालिकेचा प्रश्न धसाला लावला. विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत नोंदवले. दरम्यान, काँग्रेस सरकार जाऊन भाजप-सेना सरकार सत्तेवर आले. एक एप्रिलला शेवगाव नगरपालिका होणार असल्याचे १५ दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या सह्याचे आदेश पोहोचले. ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका स्थापन करून तहसीलदारांना प्रशासकीय आदेश पाठवण्यात आले. अनेक ठिकाणी प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील झाली. जिल्ह्यातील कर्जत, अकोले येथे नगरपंचायत स्थापन होऊन कारभारही सुरू झाला. परंतु शेवगावला नगरपालिका होण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण असताना सरकारने शेवगावकरांना मात्र एप्रिलफुल बनवल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
शेवगावची जनता आजपर्यंत तालुक्याची सत्तास्थाने असणाऱ्या माजी आमदार नरेंद्र घुले चंद्रशेखर घुले यांना दोष देत होती. आता सत्तेची चावी भाजपच्या हातात असताना भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव ग्रामपंचायत बरखास्त करून शेवगावला नव्याने नगरपालिका व्हावी, यासाठी मौन का बाळगले, असा प्रश्न शेवगावकरांना पडला आहे.

कारखाना निवडणुकीने विलंबाची चर्चा
शासनाने शेवगाव ग्रामपंचायतीचे तातडीने नगरपालिकेत रूपांतर करून सर्वांगीण विकासासाठी नियोजन आराखडा तयार करावा. महाराष्ट्रात पहिले स्मार्ट टाऊन म्हणून शेवगाव शहर घोषित करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव काकडे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. निवेदनावर अॅड. काकडेंसह विनायक खेडकर, राधेश्याम तिवारी, भाऊसाहेब सातपुते, कल्याणराव कमानदार, सचिन आधाट यांच्या सह्या आहेत.

नगरपालिका करून स्मार्ट टाऊन म्हणून विकास करा
जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीची राजकीय झालर ग्रामपंचायती बरखास्त करू देण्यापर्यंत पोहोचल्याची शेवगाव, नेवासे तालुक्यांत चर्चा सुरू आहे. वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर, मुळा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या निवडणुकीत सहकार सम्राटांनी ज्या पद्धतीने आपले संस्थान ताब्यात ठेवण्याची परंपरा कायम ठेवत राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र अन कायम शत्रू नसतो हे दाखवून दिले. भविष्यात तालुक्याच्या आगामी राजकारणात काहीही घडू शकते.