आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नियम डावलून शिक्षण उपसंचालकाच्या पत्नीची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रशासकीय बदलीत राजकीय दबाव आणणार्‍यांवर कारवाईचा इशारा देणार्‍या नगर तालुका पंचायत समिती प्रशासनाने शिक्षण उपसंचालकाच्या शिक्षक पत्नीची हवी त्या ठिकाणी बदली केल्याचे उघड झाले आहे. ही ‘कामगिरी’ पार पाडणार्‍या गटशिक्षणार्‍याला बढती देण्यात आली आहे. दरम्यान, याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सभापती सुनीता नेटके यांनी दिला आहे.

शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांची पत्नी रत्नाबाई मुरकुटे (माहेरचे आडनाव) बुर्‍हाणनगर येथील शाळेत शिक्षिका होती. प्रशासकीय बदलीसाठी त्यांनी अर्ज करून हिवरेबाजारला पसंती दिली. प्रशासनाने त्यांची हिवरेबाजारला बदली निश्चित केली. मात्र, हे ठिकाण अडचणीचे वाटल्याने त्यांनी गुंडेगाव येथील कासारमळा ही दोन शिक्षकी शाळा निवडली. त्यानुसार कासारमळा येथील शाळेत त्यांची बदली करण्यात आली. परंतु त्या हजर झाल्या नाहीत.

अपघातामुळे गुडघ्याचा त्रास असल्याने शहराजवळची शाळा देण्याची विनंती त्यांनी केली. अर्जासोबत त्यांनी बीएचएमएस डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडले. साध्या रजेसाठीही बीएचएमएस डॉक्टरचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात नसताना गटशिक्षणाधिकार्‍यांनी तत्परता दाखवत पुन्हा नवा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठवला. मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनीही तत्परता दाखवत प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला. अवघ्या सोळा दिवसांत त्यांच्या सोयीनुसार बोल्हेगाव फाटा येथील रेणुकानगर शाळेत त्यांची बदली करण्यात आली. या बदलीच्या मोबदल्यात गटशिक्षणाधिकार्‍यांना बक्षिसी म्हणून शिक्षणाधिकारी पदावर बढती देण्यात आली.

वरिष्ठ अधिकार्‍यांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या या बदलीस नेटके यांनी 26 जूनला हरकत घेतली. मात्र, प्रशासनाने मुरकुटे यांना 29 ला रेणुकानगर शाळेत हजर करून घेतले. बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा बदलीच्या आदेशात देण्यात आला आहे. हाच नियम अधिकार्‍यांना लावून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.