आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Make A Plan To Face Drought Condition In Beed

प्रशासनाने तयार केला आपत्कालीन पीक नियोजन आराखडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दोन वर्षांपूर्वी अनुभवलेला दुष्काळ यंदाही नशिबी येतो की काय, ही धास्ती यंदा पावसाने ताण दिल्याने सतावत आहे. जून महिन्यात हिरवाईने नटणारे डोंगर यंदा ओस पडले आहेत. पाऊस नसल्याने केवळ दोनच टक्के पेरण्या झाल्या आहेत. टंचाई स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला आहे.

सतत चार-पाच वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना बसतो आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती, पेरण्या लांबवणीवर पडणे, कमी, अधिक पाऊस झाल्याने दुबार पेरण्यांचे संकट झेलत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या वर्षी खरिपाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत एकूण क्षेत्र 7 लाख 98 हजार 600 क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, जून महिन्यात पावसाला प्रारंभ होणे अपेक्षित असतानाही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांपुढे पेरण्या कराव्यात की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सात जूनपासून पावसाळा सुरू होतो.

या अंदाजाने जिल्हाभरातील शेतक-यांनी मे महिन्यापासून शेतात खरिपाचे कोणते पीक घ्यायचे याचे नियोजन करून बियाणे, खते, औषधे यासह अन्य आवश्यक साहित्याची खरेदी करून ठेवली. परंतु पेरणीयोग्य पाऊस जिल्हाभिरात न झाल्याने जुलै महिना उजडला तरी पेरण्या खोळंबलेल्या आहेत. हे पाहून कृषी विभागाकडून जिल्हाधिका-यांनी आपत्कालीन टंचाई आराखडा तयार करून घेतला आहे.

जिल्हाधिकारी राम यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाच्या अधिका-यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार खरीप भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्ये, खरीप भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन इतर तेलबिया, कापूस ही खरिपाची पिके आहेत. यात अंबाजोगाई व परळी तालुक्यात पाऊस काही प्रमाणात झाल्याने या तालुक्यांमध्ये पेरण्या झाल्या असून बागायतदार व ठिबक सिंचनावरील काही शेतकºयांनी पेरण्या केल्या आहेत.

पाऊस पडला, तरच पेरण्या करा
- मागील वर्षी जून, जुलैमध्ये चांगला पाऊस होता. या वर्षीचे चित्र वेगळेच आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे. शेतक-यांनी पेरणीयोग्य पाऊस झाला, तरच पेरण्या कराव्यात. सात जुलै ते 15 जुलैपर्यंत पाऊस येईल, असा अंदाज आहे. दरम्यान, पाऊस झाल्यास खरिपाची सर्व पिके शेतकºयांना घेता येतील. पाऊस लांबणीवर गेला, तर मूग-उडीद या पिकांच्या जागी अन्य पिके घ्यावी लागतील.’’ डी.बी. बिटके, कृषी विकास अधिकारी

तालुकानिहाय पाहणी दौरा
- यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात वादळ, गारांच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटग्रस्तांना अनुदान वाटप सुरू आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेती पिकासह अन्य टंचाईच्या समस्या निर्माण होत आहे. सात जुलैपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे. पाऊस न झाल्यास 16 जुलैपासून तालुकानिहाय दौरा करून शेती, पाणीटंचाईचा आढावा घेतला जाईल.’’ नवल किशोर राम, जिल्हाधिकारी