आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार अधिकार्‍यांविरोधात राजळेंची पोलिसांत तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव व जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांच्यासह चार वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपली जाणीवपूर्वक बदनामी केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा तक्रारअर्ज माजी आमदार राजीव राजळे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिला.

राजळे यांनी रवींद्र पाटील यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार पाटील यांच्यासह डॉ. जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे व जगन्नाथ भोर यांनी मागील आठवड्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यांकडे केली होती. या तक्रारीचे पडसाद जिल्हाभर उमटत असताना राजळे यांनी शुक्रवारी या अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रारअर्ज दाखल केला. आपण अतापर्यंत आमदार, जिल्हा बँक संचालक, वृध्देश्वर दूध संघाचे संस्थापक, महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे सिनेट सदस्य अशी विविध पदे भूषवली. गेली 20 वर्षे आपण सार्वजनिक जीवनात वावरत आहोत. कोणीही आपल्याविरोधात तक्रार केलेली नाही, असे राजळे यांनी नमूद केले आहे. कोणत्याही अधिकार्‍याला अपशब्द वापरले नसताना बदनाम करण्याच्या हेतुने पाटील, जाधव, पावडे व भोर यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी असल्याचा फायदा घेत माझी बदनामी केली. या सर्वांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राजळे यांनी केली आहे.