आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Will Be Given 100 Crore To Animal Feed For Drought Situation

जनावरांच्या छावण्यांसाठी 100 कोटी देऊ, अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दुष्काळी परिस्थितीत पशुधन जगवणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या छावण्यांसाठी आगामी काळात संभाव्य खर्चापोटी लागणारा 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील टंचाईबद्दल आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबन पाचपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्षा मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अगरवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, आमदार विजय औटी, चंद्रशेखर घुले, भाऊसाहेब कांबळे, शंकर गडाख, शिवाजी कर्डिले, अशोक काळे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांच्या दरवाजे दुरुस्तीसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, अस सांगून जिल्ह्यातील सिमेंट बंधार्‍यांची कामे दज्रेदार करावीत, अशी सूचना त्यांनी केली. पाझर तलावांची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामासाठी व पाझर तलावाच्या घळभरणी कामासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवण्याचे आवाहन केले. आजारामुळे जनावरे छावणीबाहेर नेले तरी त्यांना चारा-पाण्यासाठी अनुदान दिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जनावरांच्या छावण्यांमध्ये शासनातर्फे दिल्या जाणार्‍या पशुखाद्याव्यतिरिक्त 4 किलो मोफत अतिरिक्त पशुखाद्य दिले जात आहे. कुकडी धरणातून पिण्याचे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. क वर्ग नगरपालिका क्षेत्रात जनावरांच्या छावण्या सुरू करायला मान्यता दिली आहे. जनावरांना चार्‍यापोटी दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ केली आहे, असे पालकमंत्री बबन पाचपुते यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला लोकप्रतिनिधींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मला जाऊ द्या ना आता.. किती निवेदने देता ?
दुष्काळी दौर्‍यानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थेट हेलिपॅडवर जाईपर्यंत निवेदनांचा वर्षाव होत होता, कारण मंत्री नगरमध्ये आल्यावर कोण ही पर्वणी सोडणार? शेवटी वैतागलेल्या पवार यांनी पोलिस परेड मैदानावर आलेल्या कार्यकर्त्यांना ‘मला जाऊ द्या, आता आणखी किती निवेदने देता? असा सवाल केला. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याबरोबरच महागाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध क्षेत्रांतही अनेकांचे प्रश्न वेगळे आहेत. हे प्रश्न उमुख्यमंत्र्यांकडून सुटतील, अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. त्यामुळे पवार यांचा दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर ते माघारी जाताना पोलिस परेड मैदानावरील हेलिपॅडवर गेले. त्या वेळी नागरिकांनी व कार्यकर्त्यांची त्यांना आपले निवेदन देण्यासाठी झुंबड उडाली. मात्र, दुष्काळग्रस्तांचा कळवळा आल्यासारखी भाषणे ठोकणार्‍या पवार यांनी निवेदने स्वीकारताना वैताग दाखवत अनेकांचा अपेक्षाभंग केला.

जिल्हाधिकार्‍यांच्या मागण्या
शिरपूर पॅटर्न राबवण्याबाबत मार्गदर्शन करावे. तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा योजनेतून 15 टक्के निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. पिण्याचे पाणी भरण्यासाठी जनरेटर खरेदीला व डिझेलचा खर्च करायला परवानगी द्यावी. तलावांच्या दुरुस्तीसाठी 33 कोटींचा निधी द्यावा. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये द्यावेत.

लोकप्रतिनिधींची बैठकीकडे पाठ
जिल्ह्यातील टंचाई आढावा बैठकीकडे काही लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता इतर लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. काही आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी टंचाई आढावा बैठक घेतली होती. त्या वेळी लोकप्रतिनिधींना बोलावले नव्हते. या वेळी मात्र तसे नव्हते, तरीही जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह जिल्ह्यातील इतर आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.