आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाड्या तोडणारे पक्ष सत्तेसाठी हपापलेले - कॉ. गोविंद पानसरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीत युती व आघाडी तुटलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आम्ही एक आहोत हे सांगणाऱ्यांचा हिंदुत्वाचा नव्हे, तर स्वत:चाच अजेंडा होता, हे आता स्पष्ट झाले आहे. युती व आघाडी तोडणारे सत्तेसाठी हपापलेले असल्याचे यावरून लक्षात येते, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी शनिवारी केली. शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पानसरे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व मनसे हे सर्व बाजारी अर्थव्यवस्थेचे समर्थन करणारे भांडवली पक्ष आहेत. चारही पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बदललेल्या पक्षांवरून हे चारही पक्ष एकच असून त्यांचे मतभेद वैचारिक नसून फक्त सत्तेसाठीच आहेत.
शरद जोशी भाजपत गेले म्हण्ून बाहेर पडलेल्या स्वाभिमान्यांनी भाजपलाच जवळ केले. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणाऱ्या रामदास आठवलेंनी भाजपशी दोस्ती करीत व्यक्तिगत सत्ता हेच तत्त्व मान्य केले. विधानसभेत कुणाही एका पक्षाची सत्ता येणार नाही. निवडणुकीनंतर पुन्हा आघाड्याच कराव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीत भाकप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, जनता दल, या पक्षांनी एकत्रितपणे महाराष्ट्र डावी लोकशाही समिती स्थापन करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लाल निशाण (लेनिनवादी) व प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघ व समितीशी कोल्हापूर जिल्ह्यात व इतरत्र अनेक ठिकाणी सहकार्य करून निवडणुका लढवत आहेत. सत्तेचे दावेदार असलेले महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष महागाई, भ्रष्टाचार वाढवणारे आहेत. त्यांची धोरणे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारी आहेत. या धोरणाविरुद्ध महाराष्ट्र डावी लोकशाही समिती निवडणुका लढवत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी पारनेर मतदारसंघाचे उमेदवार अंबादास दौंड, नानासाहेब कदम, भगवान गायकवाड, सुधीर टोकेकर, रमेश नागवडे, संजय नांगरे, पोपट जाधव उपस्थित होते.