आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक भांडार गैरव्यवहार तपासाचे पोलिसांना आदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अहमदनगर सेंट्रल को. ऑप. कंझ्युमर्स होलसेल अ‍ॅण्ड रिटेल स्टोअर्स (ग्राहक भांडार) या संस्थेमधील गैरव्यवहाराची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 202 प्रमाणे प्रोसेस इश्यू करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह 19 जणांनी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
ग्राहक भांडारचे 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2010 या दोन वर्षांचे एकत्रित लेखापरीक्षण सरकारी ऑडिटर एस. बी. सोनवणे यांनी केले. संस्थेमध्ये 18 लाख 53 हजार 160 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब समोर आली. या गैरव्यवहारावर पडदा टाकण्यासाठी दीड लाखांचा ड्राफ्ट हिंदुस्थान पेट्रोलियम या गॅस कंपनीला देण्यात आला होता. परंतु कंपनीने ग्राहक भांडारची एजन्सी निलंबित केली. संस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी सोनवणे हे 4 नोव्हेंबर 2011 रोजी तोफखाना ठाण्यात गेले, परंतु फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही. नंतर जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांना पत्र देऊन फिर्याद दाखल करून पुढील कारवाई करण्याची मागणी केली. तरीदेखील दखल न घेतल्यामुळे फिर्यादी संजय शिवाजीराव डापसे (वंजारगल्ली) यांनी 2 डिसेंबर 2011 रोजी न्यायालयात फौजदारी केस दाखल केली. 16 जानेवारीला मुख्य न्यायदंडाधिकारी जी. ओ. अगरवाल यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. फिर्यादीच्या वतीने राजेश पुलाटे व शशिकांत रकटे यांनी बाजू मांडली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 प्रमाणे प्रोसेस इश्यू करून या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
आरोपींमध्ये दिग्गज - चंद्रशेखर मारुतराव घुले, दादाभाऊ दशरथ कळमकर, शरद नारायण रच्चा, प्रदीप शांतीलाल बोरा, विजयसिंग किसनसिंग परदेशी, शरद लिंगप्पा क्यादर, शंकरलाल भंडारी, डॉ. राजकुमार नवलमल गांधी, छायाताई अशोक फिरोदिया, सुनंदा सुरेश भालेराव, वैभव विलास लांडगे, सुनीता रमेश सारसर, मीना वसंत मुनोत, हिरालाल उत्तमचंद भंडारी, प्रकाश हिरालाल गांधी, बा. र. शिंदे (गॅस विभाग प्रमुख), दि. गो. देवकर (कर्मचारी), विक्रम सांगळे (जुना दानेडबरा).