नगर जिल्ह्यात विधानसभेचे नगर शहर, नेवासे, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे, पाथर्डी-शेवगाव, कर्जत-जामखेड व पारनेर असे १२ मतदारसंघ आहेत. यापैकी फक्त बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमध्ये काहीच अडचण येणार नाही, अशी स्थिती आहे. बाकीच्या सर्व ११ मतदारसंघांत शेवटच्या टप्प्यात तीव्र चुरस निर्माण झाली आहे. कोपरगावात या वेळी आमदार अशोक काळे यांचे पुत्र आशुतोष यांच्यासमोर भाजपच्या स्नेहतला कोल्हे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. येथे काँग्रेसचे नितीन औताडे व राष्ट्रवादीचे अशोक गायकवाड उभे आहेत. काळे व कोल्हे या पारंपरिक घराण्यांतच लढत असून काँग्रेसचे नितीन औताडेही स्पर्धेत आले असले, तरी कोल्हे यांचे पारडे जड मानले जाते.
श्रीरामपूरमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे आता स्पर्धेत मागे पडले आहेत. शिवसेनेचे लहू कानडे आघाडीवर असून त्यांची लढत राष्ट्रवादीच्या सुनीता गायकवाड यांच्याशी आहे. माजी खासदार व भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे यांचे अस्तित्व या लढतीत कोठेच जाणवत नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची श्रीरामपुरात पकड आहे. त्यांची साथ मिळाल्यास कांबळे यांचा विजय अवघड नाही; पण ससाणे यांनी
आपले पत्ते उघड केलेले नाहीत. गायकवाड एकमेव बौद्ध उमेदवार आहेत. या मतदारसंघात बौद्ध मतदान ६० हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे येथे खूप जातीय गुंतागुंत आहे. सध्यातरी कानडे यांचे पारडे जड आहे.
राहुरीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी व मंत्री जयंत पाटील यांच्या भगिनी डॉ. उषा सध्या आघाडीवर आहेत. गेल्या गुरुवारी राहुरीत पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. तिचा लाभ भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना होण्याची चिन्हे दिसत असताना कर्डीलेंनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता असून त्याचा लाभ तनपुरेंना मिळू शकतो. नेवासेत शंकरराव गडाख याच्यासमोरील भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांचे आव्हान मोदींच्या सभेनंतर अधिकच जड झाले आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील रोष, मुरकुटे यांची सौम्य प्रतिमा या बाबी त्यामागे महत्त्वाच्या ठरत आहेत. या मतदारसंघातील जिल्हा पिरषदेच्या दोन गटांवर राष्ट्रवादीचे शेवगाव-पाथर्डीतील उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या शेवगाव-पाथर्डीत गडाख यांचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांचा प्रचार करत असल्याची चर्चा आहे. कारण गडाख व राजळे यांचे जवळचे नाते आहे. घुले यांनी गडाख यांना नेवासे तालुक्यात दणका दिल्यास त्याचा फटका गडाख यांना बसू शकतो.
श्रीगोंद्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पारडे जडच आहे. त्यांच्या विरोधातील राहुल जगताप यांना विरोधकांतील मतविभागणीचा फटका बसणार आहे. पाचपुतेंना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याची सर्व व्युहरचना पवार काका-पुतण्यांनी केली. तिला ब-यापैकी यश आले, तरी ते पाचपुतेंना जिंकण्यापासून रोखू शकणार नाहीत, अशी सद्य:स्थिती आहे. कर्जत-जामखेड हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे. गेली २० वर्षे तेथे भाजपचा आमदार आहे. सध्याचे आमदार राम शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके तुल्यबळ उमेदवार आहेत. पण, शिवसेनेचे रमेश खाडे यांनी या मतदारसंघात प्रचारात मुसंडी मारली आहे. तेही आता स्पर्धेत आहेत. एकूण जातीची गणिते पाहता प्रा. शिंदे विजयाचे प्रबळ दावेदार आहेत.
पारनेर तालुक्यात आमदार विजय औटी यांच्या विरोधात भाजपचे बाबासाहेब तांबे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादीचेच बंडखोर माधवराव लामखडे नगर तालुक्यातील आहेत. औटी यांना लाभकारण ठरणा-या नगर तालुक्यातील आता लामखडे यांचा प्रभाव राहणार आहे. परिणामी, पारनेरमध्ये औटी व तांबे यांच्यात खरी लढत होईल. तांबे यांनी त्यांच्या गावात केलेल्या कामांचा तालुक्यात प्रभाव आहे. त्याचा त्यांना मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. याउलट आमदार औटी यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे सुजित झावरे मुख्य स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत.
पाथर्डी-शेवगावात राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासमोर ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या मोनिका राजळे यांचे आव्हान आहे. भगवान गडावरील मेळावा, मोदींची सभा, शेवगावातच आमदार घुले यांचे आधीचे समर्थक दिलीप लांडे यांनी घेतलेली विरोधाची भूमिका याचा फटका घुले यांना बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतो.
* १२ मतदारसंघ आहेत नगर जिल्ह्यात
* ०५ जागा भाजपला मिळण्याची चिन्हे
राठोडांची कडवी झुंज
नगर शहरात प्रारंभी आमदार अनिल राठोड यांचे पारडे जड होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नियोजन नसतानाही अचानक ती नगरला घेण्यामागे चुरस हेच कारण आहे. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, काँग्रेसचे सत्यजित तांबे यांचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे राठोड यांना जागा टिकवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
विखेंना आव्हान शेळकेंचे
शिर्डीतूनही राधाकृष्ण विखे यांच्यासमोर शिवसेनेचे अभय शेळके यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दी पाहता कोणालाही धडकी भरेल अशी स्थिती आहे. शिर्डीत शेळके यांना प्रतिसाद मिळत आहे, तरीही विखे यांचे लोणी-प्रवरा, आश्वी परिसरावर वर्चस्व आहे. शेळके यांना तिकडे मुसंडी मारता आली, तर निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागू शकतो.
पुत्राच्या विजयाचे आव्हान
राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी या वेळी त्यांचे चिरंजीव वैभव यांच्यासाठी अकोलेतून उमेदवारी मिळवली; पण त्यांच्यात महादेव कोळी समाजाचे विरोधक भाजपचे अशोक भांगरे यांनी या वेळी पिचड यांच्या तोंडाला फेस आणला आहे. विशेष म्हणजे पेड न्यूजबाबत वैभव पिचड यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली असून निवडणूक शेवटच्या दिवशी कुठेही फिरू शकते.
असे राहील बलाबल...?
गेल्या वेळी (२००९) विधानसभेत आघाडीला सात (राष्ट्रवादी ४ व काँग्रेस ३), तर युतीला (शिवसेना ३ व भाजप २) ५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी भाजप ५, शिवसेना ३, काँग्रेस २ व राष्ट्रवादी २ असे बलाबल राहण्याचा अंदाज आहे. अर्थात, हा अंदाज विद्यमान स्थितीमधील असून काही मतदारसंघांमध्ये तर अगदी अखेरच्या क्षणापर्यंत चुरस रंगणार असून तेथील निकाल अखेरच्याच दिवशी बांधणे शक्य होणार आहे.