नगर - भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. या स्वतंत्र सदस्य नोंदणीमुळे पक्षातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. खासदार गांधी यांनी नगर शहरासह दक्षिणेतील ९ तालुक्यांतील सदस्य नोंदणीची सुरुवात माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली. प्रत्येक तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी गांधी म्हणाले, नगर दक्षिणेत पाच लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पदाधिका-यांनी अंग झटकून सदस्य नोंदणी करावी. अमोल गर्जे, शरद दळवी, बाळासाहेब महाडिक, रवी सुरवसे, विक्रम तांबे, भगवान मुरूमकर, गीता गिल्डा, सुवर्णा पाचपुते, बाळासाहेब कोळगे, सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, मनेष साठे, अनिल गट्टाणी, प्रशांत मुथ्था, किशोर बोरा, नितीन शेलार, विठ्ठल कानवडे आदी यावेळी उपस्थित होते.
आगरकर यांनी निर्मलनगरमधील भगवानबाबा चौकात सदस्य नोंदणी सुरु केली. यावेळी नगरसेवक महेश तवले, अशोक कानडे, संपत नलावडे, विजय घासे उपस्थित होते.