आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"लँडलाइन' फोन उरले फक्त "ब्रॉडबॅण्ड' पुरतेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आज जवळपास घरातील प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन आला आहे. मोबाइलचे दरही अत्यल्प आहेत. कधीकाळी श्रीमंतीचे लक्षण मानल्या जाणा-या लँडलाइन फोनला मात्र सध्या घरघर लागली आहे. सन २००७ मध्ये दोन लाखांवर संख्या असणारी लँडलाइनची संख्या जानेवारी २०१५ अखेर ६६ हजार ५२२ वर आली आहे.
लँडलाइन इंटरनेटच्या अतिवेगवान जगात ब्रॉडबँडमध्ये बदलू लागली आहे. मोबाइलमुळे बोलण्यासाठी लँडलाइनवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले असल्याने बीएसएनएलचे कनेक्शनधारक कमी होत असले, तरी याच कालावधीत बीएसएनएलच्या ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये मात्र तिपटीपेक्षा जास्त वाढ होत आहे. लँडलाइनच्या माध्यमातून ही सुविधा मिळत असल्याने बोलण्यासाठी कमी व इंटरनेटसाठी जास्त वापर असाच प्रकार जास्त सुरू आहे. त्यातच वर्षभरात बीएसएनएलने दोन वेळा एसटीडी दरांत एक रुपयांपर्यंत, तर मासिक भाड्यात दहा ते पंधरा रुपयांपर्यंत वाढ केली. दर तीन किंवा सहा महिन्यांनी लँडलाइनच्या दरात व मासिक भाड्यात होणारी वाढ आणि रेंजची समस्या होत असल्याने अनेकांनी मोबाइलवर एक पैसा कॉल असताना महागडी लँडलाइन वापरायची कशाला, हा विचार करून अनेकांनी लँडलाइनचे कनेक्शन कट केले अाहे.

सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालयांना संपर्कासाठी आवश्यक असल्याने तिथेच लँडलाइन कार्यरत आहेत. एकेकाळी प्रतिष्ठेचा समजला जाणारा दूरध्वनी आता अनेक घरात क्वचितच पहायला मिळतो. खासगी मोबाइल कंपन्या ज्या पद्धतीने दर कमी करतात, ते सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलला शक्य नाही. लँडलाइनला अडचण आल्यास, काही बिघाड झाल्यास बीएसएनएलचे कर्मचारी वेळेवर पाेहोचत नाही. यामुळेही बहुतेकांनी लँडलाइन कनेक्शन कट करणेच पसंत केले आहे.
ठेकेदारांकडून नुकसान भरपाई घ्या-
बीएसएनएलच्या भूमिगत केबलचे रस्ते खोदाई किंवा इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. केबल तुटल्यामुळे सेवा विस्कळीत होते. त्यामुळे शहरात असे नुकसान होत असेल किंवा झालेले असेल, तर मनपा आयुक्तांशी चर्चा करून बीएसएनएलचे झालेले नुकसान ठेेकेदारांकडून वसूल करण्यात यावे व ठेकेदाराला "नो ड्यूज'चे प्रमाणपत्र दिल्यानंतर मनपाने ठेकेदाराचे बिल अदा करावे यासाठी महाव्यवस्थापक पुढाकार घ्यावा, असे पत्र वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनीलकुमार गर्ग यांनी राज्यातील सर्व महाव्यवस्थापकांना पाठवले आहे.

दोन लाखांची संख्या आली ६६ हजारांवर
जिल्ह्यात २ लाख १६ हजार लँडलाइन कनेक्शनधारक हा सर्वाधिक आकडा होता. मागील सात वर्षांत हा आकडा ६६ हजार ५२२ वर आला आहे. सन २०१० नंतरच लँडलाइन दूरध्वनीत वेगाने घट झाली. मात्र, बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा इतरांच्या तुलनेत स्वस्त आहे. तसेच जिल्ह्यात जिथे जिथे लँडलाइन असेल तिथे ब्रॉडबँड मिळत असल्याने खासगी कंपनींसारखा रेंज नसल्याचा प्रश्न नाही.
ब्रॉडबँड वापरणा-या ग्राहकांच्या संख्येत वाढ-
नगर जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे आहे. त्यामुळे जिथे लँडलाइन आहे, तिथे ब्रॉडबँडची सेवा दिली जाते. शहर व जिल्ह्यातील लँडलाइनची कनेक्शन्स जरी कमी होत असली, तरी ब्रॉडबँड वापरणाऱ्यांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या सुविधेमुळे भविष्यात लँडलाइन ठेवण्याचा कल वाढेल अशी आशा आहे.'' डी. एस. ठुबे, उपमंडल अभियंता (विपणन) बीएसएनएल.