आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Madhukar Picada,Latest News In Divya Marathi

स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी प्रयत्न करा, पालकमंत्री मधुकर पिचड यांचे ध्वजवंदनप्रसंगी आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी (15 ऑगस्‍ट) केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर पिचड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, महापौर संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा काकडे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी या वेळी उपस्थित होते. पिचड म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून भारताला स्वांतत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून काम करावे. जिल्ह्यात अकोले वगळता इतरत्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. या वर्षी राज्य शासनाने टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यासाठी जिल्हा हा निकष न मानता तालुका घटक निकष धरला आहे. टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांत कृषिपंपांच्या वीज बिलात सवलत, शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शेतसारा माफी आदी विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने राज्यातील टंचाई निवारणाला अग्रक्रम दिला आहे. टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. सूत्रसंचालन गीतांजली भावे यांनी केले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तहसीलदार कैलास पवार, जिल्हा कोशागार अधिकारी विजय कोते, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी या वेळी उपस्थित होते.
पोलिस सरंक्षणात पालकमंत्र्याचे भाषण
धनगर समाजाच्या आरक्षणाचा धसका राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमात गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिस कवायत मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालकमंत्री पिचड यांचे भाषण सुरू असताना त्यांना चारही बाजूंनी पोलिस सरंक्षण देण्यात आले होते.
नागरिकांना पोलिसांनी रोखले
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रथमच सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांनी कवायत मैदानावर जाण्यास मज्जाव केला. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग हे या कार्यक्रमासाठी आले असता प्रवेश द्वारावर त्यांचे वाहन अडवण्यात आले. अन्य शासकीय अधिकारी व कर्मचाºयांसह सर्वसामान्यांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला नाही. त्यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले.