नगर - सध्याची टंचाई स्थिती पाहता त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, जिल्ह्यातील 670 गावे 50 पैसे आणेवारीच्या आत आहेत, असे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी सोमवारी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पिचड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी धनंजय कर्डक व अन्य अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी पिचड यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई, तसेच धरणातील पाणीसाठे व चा-याचा आढावा घेतला. ते म्हणाले, श्रीगोंदे-कर्जतसाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पुणे विभागीय आयुक्त व नाशिक विभागीय आयुक्त निर्णय घेतील. राहुरीसाठी गोदावरी नदीतून पाणी सोडावे लागेल. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत आराखडा तयार करण्यात यावा. माणसे व जनावरे जगवण्याला शासन प्राधान्य देणार आहे. टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, भंडारदरा धरणात सध्या 2392 दशलक्ष घनफूट, मुळात 6083 दशलक्ष घनफूट व निळवंड्यात 425 दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. भविष्यातील चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर राहुरी कृषी विद्यापीठात चारापीक घेण्याचे नियोजन आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची 776 कामे जिल्ह्यात सुरू असून, त्यावर 6315 मजूर काम करत आहेत.
छावण्यांच्या मागणीत वाढ
कृषी अधीक्षक अंकुश माने जिल्ह्यातील पिकांची माहिती बैठकीत सांगत असताना पिचड म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे टँकर व चारा डेपो यांची मागणी वाढणार आहे.चा-याची मागणी वाढणार असल्याने त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यावर माने म्हणाले, राहुरी कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रावर चारापिके घेण्यात येणार आहे.
खरिपाच्या 13 टक्के पेरण्या
जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाच्या 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. नगर, जामखेड व राहुरी या तीन तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. एकूण 53 हजार हेक्टरवर पेर झाली आहे. त्यात कडधान्य, कापूस व बाजरीची पिके घेण्यात आली आहेत. 100 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे.’’
अंकुश माने, कृषी अधीक्षक.