आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Ram Shinde Speak Issue At Nagar

उड्डाणपूल, बाह्यवळणचा निर्णय पुढील बैठकीत- जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरचा बाह्यवळण रस्ता व स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक बोलवण्यात येणार असून, या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, अतिरिक्त जिल्‍हाधिकारी शरद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
शिर्डी-नगर रस्त्याची दुरवस्था झाली असून, तो दुरुस्त करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. िशर्डी बाह्यवळण रस्ता, गोदावरी नदीवरील पूल, नगर-करमाळा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा, नगर-दौंड रस्त्याची दुरुस्ती, करंजी घाटातील दुरुस्ती त्याचबरोबर नगर शहरातील उड्डाणपूल व बाह्यवळण रस्ता याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक बोलवण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
,
मंत्री शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानासाठी शासनाने एक हजार कोटींचा निधीमंजूर केला आहे. वांबोरी पाइपचारीचे ६० लाखांचे वीजबिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

सीना नदीच्या प्रदूषणाबाबत महापालिका आयुक्त, महापौर यांची बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात येईल. निधीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्य िवभागाला सामग्री खरेदी करण्यासाठी २ कोटी ९० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पने अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सन २०१५-१६ च्या आराखड्यात २१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकार प्रशिक्षण केंद्रासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सात-बारा उतारा ऑनलाइन देण्यात नगरचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. पोलिस भरतीत लोकांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांनी देखील अशा आमिषांना बळी पडू नये, असे शिंदे म्हणाले.
विखेंची हजेरी, थोरातांची दांडी
नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीला विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी हजेरी लावली. मात्र, संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी नेहमीप्रमाणे या बैठकीला दांडी मारली. यापूर्वी झालेल्या चारही बैठकांना विखे-थोरात अनुपस्थित होते. पहिल्या बैठकीला भाजप आमदार मोनिका राज‌ळे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे या तिन्ही नव्या आमदारांनी हजेरी लावली.

४६८ कोटींचा आराखडा
जिल्‍हा वार्षिक योजनेसाठी जिल्‍हा नियोजनाच्या बैठकीत ४६८ कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात सर्वसाधारण योजनेसाठी २८४ कोटी ५९ लाख, आदिवासी उपाययोजनांसाठी ७० कोटी ६४ लाख व अनुसूचित जाती उपाययोजनासाठी ११२ कोटी ७९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या तरतुदीत ८.०८ टक्के वाढ करण्यात आली आहे.

खासगी संस्थेमार्फत होणार कामांच्या गुणवत्तेची तपासणी
- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत असलेल्या विविध शासकीय योजनांचे संनियंत्रण जिल्‍हास्तरावर जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. आता या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. कामांचा दर्जा व गुणवत्ता तपासणीसाठी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. ही संस्था वार्षिक योजनेंतर्गत असलेले रस्ते, शाळाखोल्या, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी, वसतिगृहे, सिमेंट नालाबांध, तसेच वनतळ्यांच्या बांधकामांचा दर्जा व गुणवत्ता तपासणार आहे. राम शिंदे, पालकमंत्री.