नगर- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करण्याची गरज आहे. पुण्यासारख्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी अनेक संस्था आहेत. नगरच्या विद्यार्थ्यांनाही जागतिक पातळीवरील प्रवाहांचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘सीड इन्फोटेक’ प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या ‘सीड इन्फोटेक’चे चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर राजेश वर्तक यांनी केले.
‘सीड इन्फोटेक’च्या नगर शाखेतर्फे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये आयोजित माहिती तंत्रज्ञानविषयक कार्यशाळांत ते बोलत होते. वर्तक यांनी नगरमधील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानातील जागतिक प्रवाहांची माहिती दिली. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने त्यात प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे नमूद करून त्यांनी जागतिक पातळीवरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणती तयारी करायची, मुलाखतींमध्ये काय विचारले जाते, त्यांची योग्य उत्तरे कशी द्यायची, मुलाखतीदरम्यान आपला प्रभाव कसा पाडायचा याबद्दल मार्गदर्शन केले. वर्तक यांच्या कार्यशाळा नगरकर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय मोलाच्या ठरल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या शंकांचे वर्तक यांनी पूर्ण निरसन केले.
नगरचे विद्यार्थीही माहिती तंत्रज्ञानाबाबत अपडेट राहण्यासाठी ‘सीड’ काम करणार आहे. त्यामुळे पुणे नगरच्या विद्यार्थ्यांत असणारी दरी कमी होईल. त्याचा मोठा फायदा नगरच्या विद्यार्थ्यांना होईल. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. तसेच, सीड इन्फोटेक नगरमधील महाविद्यालयांमध्ये कँपस इंटरव्ह्यू वेळोवेळी वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळाही आयोजित करणार असल्याची माहिती वर्तक यांनी दिली. या कार्यक्रमांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. कुदळ, संगणक विभागप्रमुख प्रा. डी. ए. विधाते, श्री छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे संगणक विभागप्रमुख प्रा. डी. बी. झिने, न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे संगणक विभागप्रमुख प्रा. पी. एन. निकम, ‘सीड’च्या पुणे शाखेचे बिझिनेस डेव्हलपमेंट हेड अनिल अग्रवाल आदी उपस्थित होते. ‘सीड’च्या नगर शाखेच्या प्रमुख प्राची पवार यांनी सूत्रसंचालन केले.