नगर- शीख, पंजाबी, सिंधी समाजाचे गुरू गुरुनानक देवजींनी कलियुगात नवीन धर्म स्थापन करून अवघ्या जगाला शांतता व एकतेची शिकवण दिली.ही शिकवण अंगीकारण्याचे आवाहन भाईसाहेब सुखविंदरसिंह यांनी कीर्तनातून केले.
गुरुनानक देवजी यांची 545 वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गोंविदपुरा येथे गुरुद्वारा भाई दयासिंगजी यांचे विविध कार्यक्रम झाले. फरिदकोट येथील सतनामसिंह चंदर यांची कथा, तसेच बीबी सरणजित कौर अमृतसरवाले व भाईसाहेब सुखविंदरसिंहजी तरण-तारणवाले यांचे कीर्तन झाले. त्यावेळी ते बोलत होते. जयंतीनिमित्त गुरुवारी अखंड पाठसाहेब समाप्ती नंतर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या जसपाल कृष्णलाल नारंग व नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप यांना गुरुनानक समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खासदार दिलीप गांधी व अग्नी क्षेपणास्त्र वाहक गाडीची रचना करणारे व्हीआरडीईचे डॉ. मनमोहनसिंग यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन हरजितसिंग वधवा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुभजन नारंग, विक्की मल्होत्रा, लकी वाही, प्रदीप पंजाबी, जगदीश मनोचा, हितेश कुमार, बलजितसिंग बिलरा आदीनी प्रयत्न केले.