आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावाबंदी निर्णयाचे नगरकरांकडून स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुटखाबंदीनंतर शहरात जोरात सुरू असलेल्या मावाविक्रीला आता पायबंद बसणार आहे. गुटखाबंदीला मुदतवाढ देताना अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी माव्यावर बंदी आणल्याचे सोमवारी (22 जुलै) घोषित केले. बुधवार (24 जुलै) पासून मावा विकणार्‍या टपरीचालकांवर कारवाई होणार आहे. नगरकरांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

वर्षभरापूर्वी शासनाने गुटखाबंदीची अंमलबजावणी सुरू केली. शहरात गुटखाविक्री पूर्ण थांबली नसली, तरी गुटखा खाणारा मोठा वर्ग माव्याकडे वळला होता. शहरात सुमारे तीनशे टपर्‍यांवर माव्याची विक्री होते. तीन टन सुपारीपासून बनवलेला मावा एका दिवसात विकला जातो. मावाविक्रीतून दररोज पंधरा लाखांची उलाढाल होते. प्रमुख रस्त्यांप्रमाणेच गल्लीबोळातही मावा विकणार्‍या टपर्‍यांचे पेव फुटले आहे. टपरीवर येणारा नव्वद टक्के ग्राहक फक्त मावा घेण्यासाठी येतो.

मावा खाणार्‍यांमध्ये कामगार वर्गापासून सरकारी अधिकार्‍यांचा समावेश आहे. शहरात तयार होणारा मावा ग्रामीण भागात पोहोचवण्याची व्यवस्थाही काही टपरीचालकांनी केली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मावा खाणार्‍यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पहाटेपासून सुरू झालेला हा व्यवसाय रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. काही टपर्‍यांवर माव्यासाठी वापरली जाणारी सुपारी व तंबाखू हलक्या प्रतीची असल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो.

वाहन चालवताना मावा खाऊन थुंकणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पाठीमागच्या वाहनचालकांना याचा त्रास होतो, याचे भानही बाळगले जात नाही. यातून अनेकदा रस्त्यावरच वाद होतात. रस्ते, सरकारी व खासगी कार्यालयाच्या भिंती, कोपरे, तसेच खिडक्यांच्या बाहेरची जागा मावा खाऊन थुंकणार्‍यांमुळे व्यापलेली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य नगरकरांकडून स्वागत होत आहे.

त्यांच्यावर गुन्हे दाखल करू
माव्यासह सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश आहेत. बुधवारपासून (24 जुलै) जिल्ह्यात कारवाई सुरू करण्यात येईल. गुटखा विक्रेत्यांवर जप्तींची कारवाई करून जुलैत 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तशीच कारवाई मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर करून गुन्हे दाखल करण्यात येतील.’’ शेषराव माने, सहायक आयुक्त (अन्न).

शहर यापुढे स्वच्छ राहील
मावा तसेच तंबाखुयुक्त पान खाऊन शहरात कुठेही थुंकणार्‍यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये याची उदाहरणे आहेत. शासनाच्या निर्णयाने याला चाप बसेल. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरू शकेल. मात्र, त्यासाठी अंमलबजावणी काटेकोर व्हावी.’’ संजय धोपावकर, क्रीडा मार्गदर्शक.

कडक अंमलबजावणी आवश्यक
शासनाने घेतलेला निर्णय तरुण पिढीसाठी वरदान ठरणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शासनाचे अभिनंदन करावयास हवे. प्रामुख्याने तरुण पिढीला माव्याच्या व्यसनाने वेढले आहे. यातून त्यांच्या वैयक्तिक स्वास्थ्याबरोबरच सामाजिक व सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येत होते. या निर्णयाची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.’’ डॉ. सहदेव मेढे, प्राचार्य, सारडा महाविद्यालय.

तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी हवी
माव्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. माव्याबरोबरच सर्व तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोलवर बंदी घालण्याची आवश्यकता आहे. सर्वच बाबी कायद्याने थांबवता येणे शक्य नसते. त्यामुळे शासनाने तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोलच्या दुष्परिणामांबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करणे आवश्यक आहे.’’ डॉ. प्रकाश गरुड, कर्करोग तज्ज्ञ.

वाईट सवय बंद होईल
अल्पवयीन मुलांमध्ये मावा खाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मावा खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते, याची जाणीव या मुलांना नसते. शासनाने हा चांगला निर्णय घेतला असून किमान अल्पवयीन मुलांमधील वाईट सवय घालवण्यास यातून मदत मिळेल. ’’ तेजस टिकले, विद्यार्थी.