आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hajare Agitation Failed Due To Inactive Opposition Parties

विरोधकांच्या क्षीणतेमुळे हजारेंवर उपोषणाची वेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - देशातील विरोधकांमध्ये ताकद नसल्यामुळेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लोकपाल बिलाच्या मागणीसाठी रामलीला मैदानावर उपोषण करावे लागल्याची टीका काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ललिता पाटील यांनी केली. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात मोठे फेरबदल होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

पारनेर येथे पक्षाच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे अध्यक्षस्थानी होते. राज्य चिटणीस हेमलता पाटील, युवक काँगेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे, तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, रामचंद्र मांडगे, महेश शिरोळे, बाळासाहेब पठारे, बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे, शैलेंद्र औटी, सुनीता पठारे, राजाराम एरंडे, शिवाजी खिलारी यांच्यासह मोठय़ा संख्येने काँगेस कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाल्या, राज्यातील, तसेच केंद्रातील दोन्ही अधिवेशने विरोधकांनी सुरळीत पार पडू दिली नाहीत. त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नसल्याने अधिवेशनाचे कामकाज होऊ न देण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. विरोधक कमजोर झाल्यानेच ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांना लोकपालाच्या मागणीसाठी रामलीला मैदानावर उपोषण करावे लागले.

केंद्र व राज्यात पक्षाचे सरकार असूनही छोटछोट्या समित्यांवरही कार्यकर्त्यांची वर्णी लागत नसल्याची तक्रार सार्वत्रिक आहे. कार्यकर्त्यांच्या कामाचे मोजमाप, परिमाण ठरवायचे नसेल, तर पक्षासाठी काम कशासाठी करायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडतो. प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेतली गेलीच पाहिजे. कार्यकर्त्यांच्या सार्वत्रिक तक्रारींचा अहवाल सोनिया गांधी व राहुल गांधी यांना आपण सादर करणार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

2004 व 2009 मधील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे संघटन योग्य नसल्याचे राहुल गांधी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला़ प्रत्येक महिन्यास प्रदेशाध्यक्ष, तसेच मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून प्रत्येक राज्यातील कामकाजाचा ते आढावा घेत आहेत़ राज्यात, तसेच केंद्रात खिचडीचे सरकार असल्याने ती शिजवण्यात किती नाकीनऊ येते, हे आपण अनुभवले आहे. यापुढील काळात पक्षाच्या हाती एकहाती सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, असे आवाहन त्यांनी केल़े

लोकसभा, तसेच विधानसभेचे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे नसल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून पक्षाचे चिन्ह पारनेर तालुक्यातून हद्दपार झाल्याची तक्रार काही कार्यकर्त्यांनी केल़ी त्याचा संदर्भ देऊन ललिता पाटील म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या या भावना वरिष्ठांच्या कानावर घालून दोन्ही मतदारसंघ पक्षाकडे घेत पक्षाला तालुक्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. कार्यकर्त्यांनी मात्र एकजुटीने पक्षहितासाठी काम करावे.कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल नेहमी वरिष्ठांकडून घेतली जाते, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.


पक्षाला मरगळ आल्याने बूथ कमिट्या
पारनेर तालुक्याचा राज्यातील इतर तालुक्यांनी आदर्श घ्यावा. राहुल गांधी यांचे लक्ष बूथ कमिट्या सक्षम करण्यावर आहे. अनेक वर्षे सत्तेत असल्याने पक्षाला मरगळ आली आहे. अनेकांना पदे मिळतात, कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित राहतात. त्यामुळे मला काय मिळाले याची विचारणा होऊन पक्ष खुंटण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पदरात योग्य माप टाकण्याचे धोरण काँग्रेसचे आहे.’’ हेमलता पाटील, काँग्रेस प्रदेश चिटणीस.