आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Haji Hasan Shaha Kadari Kabrastan Issue In Nagar

हाजी हसन शहा कादरी कब्रस्तानच्या गैरव्यवहार प्रकरणी सातपुतेंच्या मदतीसाठी नगरसेवक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - हाजी हसन शहा कादरी कब्रस्तानच्या "नमाजे- जनाजा' हॉलच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनपाचे दोषी अभियंता आर. जी. सातपुते यांना वाचवण्यासाठी अनेक नगरसेवक व पदाधिकारी सरसावले आहेत. या गैरव्यवहारप्रकरणी जे नगरसेवक कठोर कारवाईची मागणी करत होते, तेच नगरसेवक आता सातपुते यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आयुक्त विजय कुलकर्णी हे सातपुते यांच्या कारवाईचा प्रस्ताव लवकरच शिक्षेच्या शिफारशींसह महासभेत ठेवणार आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या व लाखो रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या सातपुते यांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिकेने शासनाच्या अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास निधीतून सुमारे १९ लाख ११ हजार रुपये खर्चाच्या नमाजे-जनाजा हॉलचे बांधकाम मंजूर केले होते. त्यासाठी बेस्ट कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेची निविदा ४. ९९ टक्के ज्यादा दराने मंजूर करण्यात आली होती. परंतु या संस्थेने अभियंता आर. जी. सातपुते यांना हाताशी धरून मंजूर नकाशाप्रमाणे हॉलचे बांधकाम केले नाही. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सातपुते यांना दोषी ठरवत निलंबित करण्यात आले होते.
प्रकरण थंड होताच आयुक्त कुलकर्णी यांनी सातपुते यांचे निलंबन रद्द केले. दरम्यान, या प्रकरणात सातपुते यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी स्थायी समितीच्या एका पदाधिकाऱ्यासह काही नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचीही चर्चा आहे.
२९ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत अनेक नगरसेवकांनी सातपुते यांच्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला. गैरव्यवहारप्रकरणी दोषी असूनही सातपुते यांना कामावर रुजू का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी आयुक्त कुलकर्णी यांनादेखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. त्यामुळे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी सादर केलेल्या सातपुते यांच्या चौकशी अहवालाबाबत आयुक्त कुलकर्णी यांनी महासभेत कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयुक्त कुलकर्णी यांनी अधिनियमातील तरतुदींनुसार आस्थापना विभागाकडून शिक्षेबाबत माहिती मागवली आहे. त्यानंतर सातपुते यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
परंतु जे नगरसेवक सातपुते यांच्या कारवाईचा आग्रह धरत होते, तेच नगरसेवक आता सातपुते यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेकांनी आयुक्तांच्या गाठीभेटी देखील घेतल्या आहेत. सातपुते यांचे प्रकरण महासभेत येऊ नये, यासाठी देखील काही नगरसेवक प्रयत्नशील आहेत. मुळात, सातपुते यांनी ज्या बांधकामात गैरव्यवहार केला, त्याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मात्र, सातपुते यांचे पद सहायक आयुक्त पदाच्या दर्जाचे आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार महासभेला आहेत, अशी सावध भूमिका आयुक्त कुलकर्णी यांनी घेतली आहे. त्यामुळे सातपुते यांच्यावरील कारवाईचा निर्णय आता महासभेतच होणार आहे. त्यापूर्वी कारवाईसाठी आक्रमक असलेल्या नगरसेवकांना शांत करण्याची मोहीम सातपुते यांनी हाती घेतली आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते, यावरच त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय अवलंबून आहे.

मगर यांची भूमिका महत्त्वाची
शहर अभियंता नंदकुमार मगर व सातपुते यांचे वैर मनपाला माहिती आहे. सातपुते यांनी मगर यांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती, हे देखील सर्वांना माहिती आहे. असे असतानाही सातपुते यांच्या गैरव्यवहाराची चौकशी मगर यांनीच केलेली आहे. नमाजे-जनाजा हॉल व नालेगाव भागातील पाइप गटारीच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत मगर यांनीच चौकशी केली आहे. त्यामुळे सातपुते प्रकरणात मगर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सातपुते यांची गच्छंती अटळ
नालेगाव भागातील पावन म्हसोबा मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत पाइपगटारीचे काम न करताच, या कामाचे सुमारे तीन लाख रुपयांचे बिल अभियंता सातपुते यांनी काढले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे, त्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे सातपुते यांची गच्छंती अटळ असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.