आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर: अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे सादर करणार्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती खात्रीलायक गोटातून समजली. या प्रकरणी गोपनीयता पाळली जात असल्याने या वृत्ताला अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकला नाही.
बदली टाळण्यासाठी सुमारे 206 शिक्षकांनी अपंग असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती. काहींनी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे ही प्रमाणपत्रे तपासणीसाठी पाठवण्यात आली. सुमारे 54 शिक्षकांची प्रमाणपत्रे बनावट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. काही नावे यादीत दोनदा असल्याने ही संख्या 51 असल्याचे नंतर स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेमार्फत या शिक्षकांवर कारवाईत दिरंगाई होत असल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. कारवाई होऊ नये यासाठी मंत्रालय स्तरावरून जि. प. प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचेही काही संघटनांचे म्हणणे होते. काही शिक्षकांनी सौम्य कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, अग्रवाल यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन बनावट प्रमाणपत्र सादर करणार्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मंगळवारी समजली.
बनावट प्रमाणपत्रे बनवणार्यांना चाप
अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयातून अर्ज घेऊन खोटे प्रमाणपत्र तयार करणार्या दलालांना आता चाप बसणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांची सही झाल्यानंतरच अपंगांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अपंग विभागात दर बुधवारी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी रांगा लागतात. प्रमाणपत्रासाठी उमेदवार आल्यानंतर रेशनकार्ड व इतर पुरावे पाहिल्यानंतर छायाचित्र घेऊन अर्ज दिला जात असे. त्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकारी तपासणी करून अपंगत्वाची टक्केवारी अर्जावर नमूद करीत असे. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्वाक्षरीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाई. या पद्धतीत स्वत: रुग्ण अर्ज घेऊन तपासणीसाठी जायचा. काही महाभाग छायाचित्राचा अर्ज हातात पडला की, दलालाकडे जाऊन बनावट प्रमाणपत्र तयार करून घेत. शिक्षकांची बनावट प्रमाणपत्रे आढळल्यानंतर या संशय बळावला. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देविदास आठवले यांनी छायाचित्राचा अर्ज थेट रुग्णाच्या हातात देणे बंद केले.
रुग्णालयाचा कर्मचारी एकाचवेळी सर्व अर्ज संबंधित वैद्यकीय अधिकार्याकडे सादर करतो. नंतर प्रत्येकाला बोलावून त्याची तपासणी केली जाते. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर टक्केवारीनुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.