आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये मूकबधिर दांपत्याने केले स्त्रीजन्माचे स्वागत, पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्त्री जन्मदर घटत असून तो वाढावा, यासाठी अनेक संस्था पुढे येत असून शासनस्तरावरही यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. उच्चशिक्षित मूकबधिर मोरे दांपत्याने स्वत:ला झालेल्या कन्यारत्नाचे स्वागत करून नवीन उपक्रम राबवले आहेत. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. एकच कन्यारत्न असलेल्या दांपत्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

स्त्रियांचा घटता जन्मदर हे चिंतेचे कारण बनत असून शासन विविध संस्थांकडून स्त्री जन्मदर वाढीसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलीच्या जन्माचे स्वागत करून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आता अनेक हात पुढे येत आहेत तसेच समाजातही स्त्री जन्माचे स्वागत होत असल्याचे दिसते. स्त्री जन्माच्या स्वागताची चळवळ उभी करून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने फलकावर जन्मदर लिहावेत, असे निर्देश शासनाने यापूर्वीच दिले आहेत.

स्त्री जन्मदर वाढवण्याचे आवाहन शासनाकडून केले जात असले, तरी लोकसहभागाशिवाय ते शक्य नाही. या पार्श्वभूमीवर मोरे दांपत्याने स्त्री जन्माच्या स्वागताचा उपक्रम नुकताच राबवला. या वेळी मोरे यांच्या कन्येचे नामकरण करण्यात आले. तसेच त्यांच्या मातोश्री जमनाबाई मोरे यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पालकमंत्री शिंदे याप्रसंगी बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, भाजपच्या भटक्या विमुक्त जाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी शेलार, सुरेश खामकर, लक्ष्मण पोकळे, बाळासाहेब ससे, वृक्षमित्र अाबासाहेब मोरे, कावेरी मोरे, भाऊसाहेब सोनवणे, जमनाबाई मोरे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, निसर्गात समाजात निर्माण झालेले प्रदूषण दूर करून समतोल ठेवण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत, झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश समाजापर्यंत जाण्यासाठी कार्यक्रम राबवणे हीच खरी समाजसेवा आहे. स्त्रियांचा घटता जन्मदर विचारात घेऊन अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मोरे दांपत्याने स्त्री जन्माचे स्वागत करून आदर्श घालून दिला आहे. उपस्थितांचे स्वागत अमोल ससे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश भगत यांनी केले.
यांना दिले कन्यारत्न

सुवर्णा सातपुते, दीपलक्ष्मी म्हसे, अश्विनी भंडारे, सविता खंडागळे, योगिनी अकडकर, छाया उंडे, सिमरन हरजितसिंग वधवा, बेबी सोनावळे, बबन साबळे यांच्यासह अकरा दांपत्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. या दांपत्यांना एकच कन्यारत्न असून त्यांना रोपे देऊन मंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.