आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाकुसरीतून अपंगत्वावर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - वयाची एकविशी ओलांडलेली.. जन्मत:च विकलांग असलेले शरीर.. स्वत:चे नैसगिक विधीही पार पाडण्यासाठी घ्यावी लागणारी दुसर्‍याची मदत.. एकूणच उमेद हरण्याची परिस्थिती समोर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आलेल्या अपंगत्वाचा बाऊ न करता अंगी बाळगलेल्या छंदाच्या जोरावर अपंगत्वावर मात करणारी ज्योत ‘मेघा’च्या रूपाने इतरांना प्रकाश दाखवणारी ठरली आहे.

संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील अवघी अडीच फूट उंची लाभलेल्या व दिवसभर अंथरुणावर पडून काम करणार्‍या मेघा गाडेकर नावाच्या मुलीची ही कहाणी कोणाचेही मन हेलावून सोडणारी आहे. ‘मुकं करोती वाचालम्, पंगू लंघयते गिरीम्’ या उक्तीप्रमाणे मेघाने आपल्या अपंगत्वावर मात करीत केलेल्या कलाकुसरीने सर्वांचेच लक्ष वेधले. बोरबनचे पोलिस पाटील दत्तात्रेय गाडेकर व अंगणवाडी सेविका निर्मला गाडेकर यांची मेघा ही मुलगी. एक शिक्षक मुलगा, दोन मुली, एकीचे लग्न झालेले. दुसरीच्या जन्मत:च अपंगत्व पदरी आले. उंचीही वाढेना आणि सतत अंथरुणात खिळलेली मेघा दिवसभर घरात टिव्ही पाहत पडलेली असे. कोणीही सामान्य व्यक्ती या सवयीत काही तासांतच बैचेन होणार, तीच अवस्था मेघाचीही झाली. मात्र, शरीर साथ देत नाही. उठून काही करावे म्हटले, तर ते शक्य नाही. घरात आजीचीच काय ती मदत. अशा स्थितीत हतबल न होता टीव्हीवरील वेगवेगळे कार्यक्रम पाहताना कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याच्या, पेंटींग्जच्या कार्यक्रमातून आपणही असेच काहीतरी करावे, असा विचार मेघाच्या मनात आला अन् तिच्या जीवनाला वेगळा आकार आला. मेघाच्या जीवनाचा कला हा अविभाज्य भाग बनला आहे. प्रारंभी तिने वडिलांना गणपतीचे चित्र आणायला सांगितले. त्यांनीही मोठय़ा प्रेमाने मुलीला चित्र आणून दिले. मेघाने ते चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. अतिशय मनमोहकरित्या आपल्या अपंग मुलीने रंगवलेले चित्र पाहून वडिलांनाही मोठा आनंद झाला. वडिलांनीही मुलीचा हट्ट पुरवत तिला हवे ते वॉलपीस, लोकरीच्या वस्तू बाजारातून आणून दिल्या. त्यातून तिने अतिशय सुंदर अशा वस्तू बनवल्या आहेत.

या वस्तू सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून मेघाचे कौतुक होत आहे. माजी जि. प. सदस्य जनार्दन आहेर, शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, परशराम पावसे, गटशिक्षणाधिकारी वसंत जोंधळे, विस्तार अधिकारी आर. एम. गायकवाड, शैलेंद्र गाडेकर, विषयतज्ज्ञ सोमनाथ मदने व सदानंद डोंगरे यांनी नुकतीच मेघाची भेट घेतली. तिने तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तुंची पाहणी केली. मेघाने त्यांनाही कलाकुसरीच्या वस्तू बनवून दाखवत अचंबित केले.