आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Handicap Issue, Zilha Partishad And District Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर; जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयात शीतयुद्ध सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बनावट अपंगांवर जिल्हा परिषदेनेच गुन्हे दाखल करावेत, असे सांगणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी धारेवर धरले. शासकीय रुग्णालयात खोट्या सह्या व शिक्क्याचे प्रमाणपत्र मिळू शकते, हे माहीत असल्यामुळेच शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्रे घेतली. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी गुन्हे दाखल करावेत, असे सदस्य म्हणाले. गुन्हे कोणी दाखल करायचे यावरून जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद प्रशासन यांच्यातील शीतयुद्ध सुरू झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, शाहूराव घुटे, हर्षदा काकडे, सदस्य राजेंद्र फाळके, सुजित झावरे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब हराळ, सचिन जगताप, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
बनावट अपंग शिक्षकांच्या मुद्दय़ावर बैठकीत चर्चा झाली. डॉ. निटूरकर यांनी अपंग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव यांच्या पत्राचा संदर्भ देऊन बनावट अपंगांवर जिल्हा परिषदेनेच गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट केले. यावर सदस्य हराळ म्हणाले, तुमच्या सही व शिक्क्याचे खोटे दाखले मिळतात हे माहीत असल्यामुळेच या शिक्षकांनी खोटे दाखले मिळवले. त्यामुळे गुन्हे जिल्हा शल्यचिकित्सकांनीच का दाखल करू नये? त्यांनी डॉ. निटूरकर यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, गुन्हा कोणी दाखल करायचा हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. गेल्या अनेक दिवसांपासून जि. प. प्रशासन व जिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्यात गुन्हे दाखल करण्यावरून अशीच टोलवाटोलवी सुरू आहे.
उपअभियंत्याच्या सेवापुस्तिकेतील खाडाखोडप्रकरणी जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत. याप्रकरणी कार्यकारी अभियंताही दोषी असल्याने त्यांनाही निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवावा, अशी मागणी हराळ यांनी केली.
500 रुपयांत अपंग प्रमाणपत्र
निलंबित शिक्षकांमध्ये काही शिक्षक खरे अपंग आहेत. मात्र, त्यांच्याकडून 500 रुपये घेऊन अपंगत्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली, असा गौप्यस्फोट कैलास वाकचौरे यांनी करून खर्‍या अपंगांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आणले. निलंबितांमधील खर्‍या अपंगांवर अन्याय होऊ नये, यासाठी अशांची पुन्हा तपासणी करून निर्णय घ्यावा, असे आदेश लंघे यांनी डॉ. निटूरकर यांना दिले.