आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाला वर्ग करणाऱ्या पल्लवीची जिद्द प्रेरणादायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंखात बळ असले की क्षीतिजापार भरारीचे स्वप्न कोणीही पाहतो, पण पंखच नसतील तरी भरारी घेण्याची धमक असलेली जिद्दी माणसं क्वचितच पाहायला मिळतात. याची प्रचिती शहरातील सिमला कॉलनीत राहणाऱ्या पल्लवी पुलगम हिला पाहून आली. बसण्याइतकीही ताकद देवाने तिला दिली नाही. पण शिक्षणाच्या ओढीमुळे तिने "कुटुंबाच्या वर्गातच' पंधरा वर्षे अभ्यास केला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तिने दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवून एक आदर्श निर्माण केला. तिची ही जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
पल्लवी ही सिमला कॉलनीत राहणाऱ्या रिक्षाचालक अभय पुलगम यांची द्वितीय कन्या. लहान मुलगी दहावीला, तर मोठी मुलगी उच्च शिक्षण घेत आहे. पल्लवीला जन्मत:च शारीरिक व्यंग होते, परिस्थिती बेताची होती. उपचारासाठी पोटाला चिमटा घेऊन त्यांनी अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडे तिला नेले. पल्लवीची अात्या रेखा वडेपेल्ली यांनीही स्वत:च्या मुलीपलीकडे पल्लवीला जीव लावला. पण तिचा आजार हा पोलिओचाच प्रकार असल्याने दोन्ही पाय हात बाधित झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उभा राहता येत नाही, बसताही येत नाही, अशी पल्लवीची अवस्था आहे. त्यामुळे शाळेत प्रवेश घेऊनही तिला एकदाही वर्गात बसता आले नाही. शाळेचा अभ्यास कुटुंबातल्या वर्गातच सुरू झाला.
अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेत तिने ज्वेलरी मेकिंग, चित्रकला, टेडी वेअर टॉईज बनवणे आदी छंद जोपासले. तिने बनवलेल्या बाहुल्या, ज्वेलरी याला परिसरातील मुला, मुलींकडून मोठी पसंती दिली जाते. यामाध्यमातून तिला काही पैसे उपलब्ध होतात. हे पैसे तिने भविष्यासाठी साठवून ठेवले आहेत. वडीलही लाडक्या लेकीसाठी घरी आल्यानंतर तिला हवे तेथे रिक्षातून फिरायला नेतात. पाहतापाहता पल्लवी दहावीत गेली. समर्थ विद्यालयात तिने प्रवेश घेतला. शाळेत येता येणार नाही, याची जाणीव ठेवून शाळेनेही तिला सहकार्य केले. दहावीचा निकाल जवळ येत असल्याने कुटुंबासह कालनीतील इतर जणांना तिला किती गुण मिळतात याबाबत उत्सुकता होती. आॅनलाइन निकाल हाती आल्यानंतर पल्लवीने ७९ टक्के गुण मिळाल्याचे समजल्यानंतर सर्वांच्या आनंदाला उधान आले. आता तिला पुढे शिक्षण घेऊन नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तिने अकरावीत कला शाखेत प्रवेश घेतला आहे.
लेकीसाठी काही पण...
पल्लवीची ओढ असल्याने मी लवकर घरी येतो. तिला फिरायला नेतो, ती सांगते तेथे तिला फिरायला नेण्याची तयारी आहे. तिला दु:ख होऊ नये, यासाठी माझा प्रयत्न असतो. या लेकीसाठी काहीही करण्याची तयारी आहे. कुटंबाचा गाडा हाकताना येणाऱ्या अडथळ्यांची पर्वा करता मेहनत सुरू आहे. देवाने तिला बसण्याइतकीही ताकद दिली नाही, पण तिला आनंद मिळावा यासाठीचा हा अट्टहास आहे. तिच्या यशाबद्दल मला तिचा अभिमान आहे, असे अभय पुलगम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
मला खूप शिकायचंय
मला आई-वडील, आत्या यांच्यासह माझे संपूर्ण कुटंुब मदत करते. आता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले, अकरावीलाही प्रवेश घेतला. मला खूप शिकायचंय आणि नोकरी करायची इच्छा आहे. वडील रोज फिरायला नेतात, आत्या मार्गदर्शन करते आणि आई माझी संपूर्ण काळजी घेते.

रायटर नाकारला

दहावीचे पेपर देत असताना पल्लवीला पेपर लिहिण्यासाठी रायटर उपलब्ध करून दिला जात होता. पण तिने रायटर नाकारत स्वत: पेपर लिहिले. स्वत: पेपर लिहून तिने दहावी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवले.
बातम्या आणखी आहेत...