आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hariyali Social Foundation Active To Remove Duat From Nagar City

नगरमध्ये रुजतेय "शून्य कचरा' संकल्पना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरात दररोज जमा होणाऱ्या सुमारे सव्वाशे टन कचऱ्यापैकी केवळ ७० ते ८० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. उर्वरित ४५ ते ५५ टन कचरा तसाच पडून राहतो. त्यामुळे नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली असली, तरी हरियालीसारख्या पर्यावरणप्रेमी संस्थेने मात्र नगर शहर कचरामुक्त करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
संस्थेच्या माध्यमातून शहरात गेल्या वर्षभरापासून ‘शून्य कचरा’ संकल्पना राबवण्यात येत आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून संस्थेने नागरिकांना बायोगॅस, गांडूळ खत, तसेच इतर पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यास प्रोत्साहित केले आहे. वर्षभरात तब्बल ३२५ नागरिकांनी गांडूळ खत ५० पेक्षा अधिक नागरिकांनी बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत.
संस्थेने सुमारे दहा हजार नागरिकांना बायोगॅस गांडूळ खत प्रकल्पाबाबत माहिती देणारे पत्रके वाटली आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व, कमी खर्चात उभे राहणारे पर्यावरणपूरक प्रकल्प, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन आदी बाबी या माहितीपत्रकात स्पष्ट करण्यात आल्या आहेत. शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, मोठ्या वसाहती आदी ठिकाणी ही पत्रके वाटण्यात आली. त्यातून ३२५ नागरिकांनी गांडूळ खत प्रकल्प, तर ५० पेक्षा अधिक नागरिकांनी बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत. परिणामी हरियालीच्या शून्य कचरा संकल्पनेस मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे.

केवळ माहितीपत्रके वाटून संस्थेने आपले काम थांबवलेले नाही, तर घनकचरा व्यवस्थापनाबाबत वीस मिनिटांची ध्वनिचित्रफित तयार करून ती शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे लहान-मोठ्या वसाहतींमध्ये दाखवली. त्यातून प्रत्येक नागरिकाला शून्य कचरा संकल्पना स्पष्ट झाली. हरियालीची ही संकल्पना थोड्याच दिवसांत साडेचार लाख नगरकरांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी संस्थेला जिल्हा प्रशासनासह महापालिकेचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे नगर लवकरच कचरामुक्त शहर म्हणून ओळखले जाईल. गरज आहे ती फक्त नागरिकांच्या सहभागाची.
आपले नगर स्वच्छ, सुंदर निरोगी असावे, हीच सर्वसामान्य नगरकरांची अपेक्षा आहे.
शून्य कचरा संकल्पनेंतर्गत नगर शहरातील जागरूक नागरिकांनी असे बायोगॅस गांडूळ खत प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या खर्चात बचत तर झालीच, शिवाय कचऱ्याचाही प्रश्न सुटला आहे.


घरातीलदैनंदिन कचऱ्याचे नियोजन व्यवस्थापन करा
संकल्पनेसाठी आपल्या हाताला मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करा
ओला सुका कचरा दररोज दोन स्वतंत्र डस्टबीनमध्ये टाका
बायोगॅस, सेंद्रिय खत गांडूळ प्रकल्पासाठी कचरा वापरला तर उत्तम.

सर्वच प्रश्न सुटले
गॅस टाकीची टंचाई, कचरा कुठे टाकायचा, तसेच वाढत्या खर्चातून मार्ग काढण्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू केला. त्यासाठी हरियाली संस्थेने सर्वतोपरी मार्गदर्शन केले. प्रकल्प सुरू करून चार वर्षे झाली, दोन्ही वेळेचा स्वयंपाक बायोगॅसवरच होतो. आतापर्यंत एक रुपयादेखील खर्च आलेला नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी बायोगॅस प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे.'' अनंतगारडे, बायोगॅस प्रकल्प धारक

सेंद्रिय खत प्रकल्प

घराच्या अंगणात दीड फूट उंचीचा आयताकृती हौद तयार करून त्याचे दोन भाग तयार करायचे. एका भागात माती त्यावर ओल्या कचऱ्याचा थर आलटून पालटून टाकायचे. प्रत्येक थर पाण्याने ओला करायचा. पहिल्या भागातील खत प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुसऱ्या भागातही अशीच प्रक्रिया सुरू करा. त्यातून घराच्या बागेसाठी वापरता येईल, असे उत्तम खत तयार होईल. नाममात्र खर्चात हा प्रकल्प सुरू करता येईल.

गांडूळ खत प्रकल्प

घरातील ओल्या कचऱ्यापासून गांडूळ प्रकल्प सुरू करता येईल. दोनशे लिटर साठवण क्षमतेच्या जुन्या निरोपयोगी प्लास्टिक अथवा लोखंडी बॅरलमध्ये पालापाचोळा मातीचे पातळ थर आलटून पालटून भरावेत. त्यात कुजणारा ओला कचरा नियमितपणे टाकल्यानंतर गांडुळांची पैदास होईल. त्यानंतर खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. वर्षाकाठी १०० किलोपक्षा अधिक खत तयार होते.

सुका कचरा : प्लास्टिक,थर्माकोल, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू, धातू, काच, कापड, रबर, बल्ब आदी.

ओला कचरा : लाकूड,पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, फुले, नारळ, शहाळे, केस नखे, अन्न, अंडी, मांस आदी.

बायोगॅस प्रकल्प

घट्ट झाकण असलेल्या छोट्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून नाममात्र खर्चात बायोगॅस सुरू करता येईल. त्यातून दररोज आठ किलो ओल्या कचऱ्यापासून ५०० ग्रॅम मिथेन गॅस मिळतो. घराच्या बाजूच्या जागेत, गॅलरीत, तसेच छतावरही बायोगॅस सुरू करता येतो. छोट्या आकाराच्या या बायोगॅसपासून महिन्याला एक सिलिंडर एवढा गॅस मिळतो. या प्रकल्पासाठी हरियाली संस्थेची तज्ज्ञ समिती मार्गदर्शन करेल.

मनपाही राबवणार संकल्पना

हरियालीने गेल्या वर्षभरापासून शून्य कचरा संकल्पनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील या संकल्पनेचे कौतुक केले आहे. महापालिका ही संकल्पना राबवण्यास तयार आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी शून्य कचरा संकल्पना महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलायला हवीत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.'' सुरेशखामकर, अध्यक्ष,हरियाली संस्था.
रिड्यूस: प्लास्टिकचाकमीत कमी वापर करून पर्यावरण संवर्धन करा.
रिसायकल: पुनर्रचक्रिय(नवीन वस्तू तयार करताना सुका कचरा पुन्हा वापरात आणावा.)
रियुझ: पुनर्वापर(दीर्घकाळ उपयोगात येतील अशा वस्तू खरेदी करून त्यांचा वापर करा.)
रिफ्यूझ: कधीचवापरणे (अविघटनशील प्लास्टिक कॅरीबॅगचा कधीही वापर करू नका)