आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्मोनियमवादक तन्मय देवचके लंडन गाजवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरच्या रसिकांसाठी ख्यातनाम कलाकारांच्या मैफलींचे आयोजन करणार्‍या ‘अनुनाद’चे संस्थापक व हार्मोनियमवादक तन्मय देवचके हे दीड महिन्याच्या परदेश दौर्‍यासाठी 17 ला रवाना होत आहेत. या दौर्‍यात ते अमेरिका, लंडन व कॅनडातील कार्यक्रमात सहभागी होतील.

तन्मय यांनी मागील वर्षी लंडनमध्ये झालेल्या दरबार फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर केली होती. त्यांच्या हार्मोनियमवादनावर खुश झालेल्या रसिकांच्या आग्रहामुळे त्यांना याही वर्षी निमंत्रण मिळाले. यंदा प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, मंजुषा कुलकर्णी आणि भारतातील सवरेत्कृष्ट तबलावादकांपैकी एक असलेल्या पंडित योगेश सम्शी या दिग्गजांसमवेत तन्मय देवचके दरबार फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. लंडनमधील कार्यक्रमाला जोडूनच पुढे अमेरिका व कॅनडातील बारा शहरांमध्ये तन्मय देवचके कार्यक्रम सादर करणार आहेत.

जगभरात विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करताना आपण नगर शहराचे प्रतिनिधीत्व करतो आहोत, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे देवचके आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले. तन्मय यांचे हार्मोनियमवादनाचे प्राथमिक शिक्षण आजोबा (कै.) गोपाळराव देवचके यांच्याकडे झाले. त्यानंतर वडील अभय देवचके व सध्या पुण्याचे पंडित प्रमोद मराठे व तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण चालू आहे.उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित उल्हास कशाळकर, संजीव अभ्यंकर यांना कलाकारांना साथसंगत केली आहे.

नगर सोडले नाही
व्यावसायिक कारणांसाठी अनेक कलावंत नगर सोडून मोठय़ा शहरांत स्थायिक झाले आहेत. तन्मय देवचके अनेक दिग्गजांसमवेत मोठय़ा शहरांमध्ये संगीत मैफली गाजवत असले, तरी त्यांनी आपले मूळ गाव नगर सोडलेले नाही. नगरमधील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.