आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यविश्‍व: 'हरवलेल्या नात्यांचं गाव'चे उद्या प्रकाशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सामाजिक आशयाच्या कवितांच्या 'हरवलेल्या नात्यांचं गाव' या संग्रहाचे प्रकाशन बुधवारी (२३ मार्च) सायंकाळी वाजता पुणतांब्यातील जैन धर्मस्थानकात अभिनेते अनंत जोग विजय पाटकर यांच्या हस्ते होणार आहे. नगरचे हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांचा हा संग्रह आहे. ऋतू प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकात ७२ कविता आहेत. मूळचा नगरचा असलेला आशिष सध्या मुंबईत सिनेसृष्टीशी संबंधित अनेक क्षेत्रांत काम करत आहे. काही चित्रपटांत मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून मालिका लेखन, चरित्रलेखन गीतलेखनात तो मुशाफिरी करत आहे.
अभिनेते सुनील बर्वे यांच्या 'हर्बेरिअम' या पुस्तकाचे शब्दांकनही त्याने केले. या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी त्याला मिळाली. मराठी अभिनेते अभिनेत्रींच्या आयुष्यावर आधारित 'स्ट्रगलर' या पुस्तकाचे लेखनही आशिषने केले आहे. 'हात आभाळाला टेकले, तरी पाय जमिनीवर ठेवण्याचे संस्कार देणाऱ्या नात्यांना अर्पण' अशा अर्पणपत्रिकेने सुरुवात असलेल्या या संग्रहाला प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांची प्रस्तावना आहे. नवे काहीतरी करण्याची उर्मी त्यासाठी संघर्षाची मानसिकता असेल तर कलाक्षेत्र आपल्याला स्वीकारते, असे हक्काने सांगणारा आशिष या कवितांमधून जगण्याचा मार्ग नात्यांची ओळख नव्याने करून देतो. या कविता मनाला नवभरारी देतात आणि नात्यांची वीण अधिक घट्ट करतात, असा विश्वास ऋतू प्रकाशनचे प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांनी व्यक्त केला. निनगुरकर लिखित "रायरंद' चित्रपटातील कलावंत तंत्रज्ञांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...